मुंबईत पावसाची ‘मुसळधार’

मुंबईत पावसाची ‘मुसळधार’

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : गेल्या आठवडाभरापासून संततधार सुरू असलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरांना झोडपून काढले. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने मुंबईकरांच्या १८ वर्षांपूर्वीच्या ‘२६ जुलै’च्या आठवणी ताज्या झाल्या. सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली होती. लोकलही उशिराने धावत होत्या. परिणामी, स्थानकावर प्रचंड गर्दी होऊन प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतही पावसाने दमदार हजेरी लावल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (ता. २७) दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा यापूर्वीच दिल्याने पालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे अंधेरी सबवे, सायन गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, चेंबूर शेल कॉलनी, दादर टीटी, परळ, मंत्रालय परिसर, गोवंडी, मानखुर्द, धारावी, माहीम, भांडुप, मालाड, गोरेगाव, कांदिवली, वांद्रे आदी सखल भागांत पाणी साचले. पावसाचा जोर वाढत असल्याचे लक्षात आल्यावर काही खासगी कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडले. चौपाट्या, समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी होऊ नये यासाठी पालिकेने चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.

तानसा, विहार ‘ओव्हरफ्लो’
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे तळ गाठलेल्या तलावांमध्ये पाणीसाठा वाढत असून, तुळशीपाठोपाठ तानसा व विहार तलावही भरून वाहू लागल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या ५८.९३ टक्के जलसाठा असून, तो पुढील २२१ दिवस म्हणजे २१ फेब्रुवारीपर्यंत पुरेल इतका असल्याची माहिती पालिका जलअभियंता विभागाने दिली.

मुंबईतील आजचा पाऊस
शहर - ७६.४५ मिलिमीटर
पूर्व उपनगर - ५८.०१ मिलिमीटर
पश्चिम उपनगर - ७०.४३ मिलिमीटर

जिल्हानिहाय सरासरी पाऊस
ठाणे - ६२.३ मिलिमीटर
पालघर - ७२.११ मिलिमीटर
रायगड - १०४.७ मिलिमीटर

मुंबईत शाळांना सुट्टी
भारतीय हवामान खात्याने मुंबईत रेड अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी पालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या (ता. २७) सुट्टी जाहीर केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.