मिरा-भाईंदरमधील भूमाफियांच्या मुसक्या आवळणार?

मिरा-भाईंदरमधील भूमाफियांच्या मुसक्या आवळणार?

भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) : मिरा-भाईंदरसह ठाण्यातील भूमाफियांकडून बळजबरीने जमीन बळकावण्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. त्यामुळे भूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

मिरा-भाईंदरमधील विकसक शामसुंदर अगरवाल याने केलेल्या जमीन घोटाळ्यांविरोधात आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. अगरवाल हा शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करून त्यांच्या जमिनी ताब्यात घेतो, त्यावर इमारती उभ्या करतो आणि हक्काचे पैसे मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना गुन्हेगारी विश्वाकडून धमक्या देतो, असा आरोप बंब यांनी केला. अगरवाल हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर मिरा-भाईंदरसह मुंबई, ठाणे येथे ३०हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्याचे गुन्हेगारी विश्वातील छोटा शकील याच्याशी संबंध असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे अगरवाल याने केलेल्या फसवणुकीची गुन्हे अन्वेषण विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करून चौकशी करण्याची मागणी प्रशांत बंब यांनी विधानसभेत केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना, मिरा-भाईंदरसह ठाण्यातील अशा पद्धतीच्या सर्वच प्रकरणांची विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जाईल व या पथकाकडून तीन महिन्यांत अहवाल मागविण्यात येईल. शिवाय अगरवाल याच्याविरोधात जी मोक्का कायद्याखाली कारवाई सुरू होती, ते प्रकरण न्यायालयात असल्याने त्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक जाईल, अशी घोषणा केली.

भूमिपुत्रांच्या जमिनी हडपण्याचे प्रकार
उपमुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर मिरा-भाईंदरमधील जमिनींवर बेकायदा कब्जा करणाऱ्या सर्वच भूमाफियांची देखील चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबईलगत असल्याने मिरा-भाईंदरमधील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. यातून शेतकऱ्यांना सुरुवातीला थोडे पैसे देऊन करार करायचे, मग जमीन ताब्यात घ्यायची व उर्वरित पैसे जमीन मालकांना न देता जमिनी हडप करायच्या, असे सर्रास प्रकार मिरा-भाईंदरमध्ये होत आहेत.

महसूल विभागाची साथ
जमीन लुटण्यासाठी काही राजकीय व्यक्ती, तसेच गुन्हेगारी विश्वदेखील गुंतले आहे आणि त्यांना महसूल विभागाची साथही मिळत आहे. मध्यंतरी उत्तन येथील अशाच जमिनींच्या प्रकरणात तलाठ्यावरही दोन गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष तपास पथकाच्या तपासात या सर्व प्रकरणांची पाळेमुळे खणली जातील व भूमाफियांना पायबंद बसेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com