यंदा पावसाळ्यातही हिंदमाता परिसरात व्यावसायिक खुश

यंदा पावसाळ्यातही हिंदमाता परिसरात व्यावसायिक खुश

हिंदमाता परिसर पूरमुक्‍त
व्यापाऱ्यांसह नागरिक सुखावले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : पावसाळ्यात मुंबईतील हिंदमाता परिसर पाणी तुंबण्यासाठी ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले होते. अगदी काही वेळ पाऊस पडला की येथे पाणी साचायचे. वर्षानुवर्षे याचा फटका या परिसरातील व्यापारी आणि आजुबाजूला राहणाऱ्यांना बसायचा. दुकानात पाणी शिरत असल्यामुळे दुकानदारांचे पावसाळ्यात आर्थिक नुकसान व्हायचे. मात्र वर्षानुवर्षांचे हे चित्र यंदा बदलले असून या वर्षी हिंदमाता परिसरात एकदाही पाणी भरपूर साचले नाही. पाणी साचण्याची कटकट कायमची बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह येथील रहिवासी सुखावले आहेत.

कपडा व्यापारी सुखावला
हिंदमाता परिसर कपडा मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कापडाचे होलसेल मार्केट आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने दुकानात पाणी शिरायचे. पाण्यात कापड भिजल्यामुळे खराब झालेला माल कमी किमतीत विकायला लागायचा. त्यामुळे पावसाळ्यात कापड व्यापाऱ्यांना वार्षिक उत्पन्नात १० टक्के नुकसान व्हायचे. यंदा पहिल्यांदा हे नुकसान सहन करावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया कापड व्यापाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली आहे.

छोट्या दुकानदारांच्या समस्या
हिंदमाता परिसरात अनेक छोटेखानी दुकानदार आहेत. याच भागात विनय महाले हे गेल्या ३० वर्षांपासून सलूनचे दुकान चालवतात. या वेळी ३० वर्षांत पहिल्यांदा हिंदमाता परिसरात पाणी साचलेले पाहायला मिळाले नाही. रस्त्याला लागून सलून असल्यामुळे दुकानात दर पावसाळ्यात २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचायचे. जर पाऊस जास्त झाला तर त्यावेळी पाण्याची पातळी चार फुटांपर्यंत जायची. त्यामुळे ग्राहक दुकानात फिरकत नसे, सोबत दुकानाचे नुकसान व्हायचे. या वेळी पालिका प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे माझा व्यवसाय सुरळीत सुरू असल्याचे महाले यांनी सांगितले.

चहा टपरी निर्धोक
७० वर्षांच्या वर्षा शिंदे या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून चहा टपरी चालवतात. त्या याच परिसरात राहतात. व्यवसाय आणि घर या परिसरात असल्यामुळे पाणी तुंबल्याच्या समस्येचा शिंदे यांना दुहेरी फटका बसत होता. पावसाळ्यात पाणी भरले की वर्षा शिंदे यांना चहा टपरी बंद करावी लागत होती. तसेच पाणी ओसरल्यावर पाण्याबरोबर आलेल्या घाणीमुळे परिसरात अस्वच्छता पसरत होती. या कारणामुळे दर पावसाळ्यात चहा टपरी चालवणे वर्षा शिंदे यांना कठीण होते. मात्र या वेळी व्यवसाय निर्धोक सुरू असल्याचा आनंद वर्षा शिंदे यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला.

स्थानिकांना दिलासा
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हिंदमाता परिसराला पाण्याखाली जावे लागत होते. येथे पाणी तुंबले की ओसरेपर्यंत तेथील नागरिकांचे आयुष्य घरात बंदिस्त होत होते. पावसाळ्यात चार महिन्यांत वारंवार समस्यांना नागरिक सामोरे जात होते. साचलेल्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या रोगराईमुळे लहान मुलांपासून वृद्धापर्यंत त्रस्त होत; परंतु या वेळेस पहिल्यांदा या समस्येतून स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी आनंद व्यक्त करत आहेत.

प्रशासनाचा तोडगा
पाणी तुंबण्याच्या समस्येवर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेने हिंदमाता येथील उड्डाण पुलाखाली मोठे ड्रेनेज पंप आणि हिंदमाता जंक्शन येथे तुंबलेले पाणी उपसण्यासाठी पंप बसवला आहे. त्‍याची क्षमता ३००० लिटर पाणी प्रतिसेकंद आहे. ज्यामुळे पाणी कमी होण्याचा वेळ काही तासांपेक्षा कमी झाल्याचा दावा केला जात आहे.

पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने दुकानात पाणी शिरायचे. पाण्यात कापड भिजल्यामुळे खराब झालेला माल कमी किमतीत विकायला लागायचा. तसेच दुकान पूर्ववत सुरू होण्यास वेळ लागयचा. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर व्हायचा.
- जयेश गाला, कपडा व्यापारी

मान्सूनमध्ये या परिसरातील कापड व्यापाऱ्यांना वार्षिक उत्पन्नात १० टक्के नुकसान व्हायचे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे यंदा पहिल्यांदाच हे नुकसान सहन करावे लागले नाही. येत्या काळातही हे कायम राहावे.
- वृषांक जैन, कापड व्यापारी

प्रत्येक वर्षी पावसाळ्यात आमच्या परिसराला पाण्याखाली जावे लागत होते. येथे पाणी तुंबले की ओसरेपर्यंत तेथील नागरिकांचे आयुष्य घरात बंदिस्त होत होते. पावसाळ्यात चार महिन्यांत वारंवार समस्यांना नागरिक सामोरे जात होते. यंदा पहिल्यांदा या समस्येतून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत.
- अतुल मांजरेकर, स्थानिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com