अतिवृष्‍टीचा रोह्यातील १८ गावांना तडाखा

अतिवृष्‍टीचा रोह्यातील १८ गावांना तडाखा

रोहा, ता. ३१ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्याला सलग पंधरा दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. रोहा-मुरूड तालुक्यातील सुमारे १८ गावांना अतिवृष्‍टीचा सर्वाधिक फटका बसला असून वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा चार दिवसांपासून खंडित झाला होता. त्‍यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शनिवारी (ता.२९) रात्री ग्रामस्थ अनंत गोरे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवून ठार केल्याची घटना घडली आहे. त्‍यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रोहे, मुरूड तालुक्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्‍या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्‍कळित झाले होते. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्‍याच्या, वीज वाहिन्या तुटल्‍याच्या घटना घडल्‍या आहेत. रोहे तालुक्यातील म्हसाडी, कांटी, बोडण, केळघर, वांदर कोंडा, खडकी, गोपाळवट, फणसवाडी, मांगीरवाडी, साठलेवाडी, आराळी, वाघिरपट्टी या गावांत वीज पुरवठा अद्याप खंडित आहे. त्‍यामुळे रात्रीच्या वेळी ही गावे अंधारात बुडून जातात. चार-पाच दिवसांपासून बत्तीगुल असल्यामुळे चार्जिंग विना मोबाईलही बंद पडले आहेत. दुर्गम-डोंगराळ भाग असल्याने आजारी व्यक्ती किंवा आपत्कालीन घटना घडल्यास संपर्क करण्यात अडचणी येत आहेत.
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी चार दिवसांत महावितरणचा एकही अधिकारी वा कर्मचारी फिरकला नसल्‍याने ग्रामस्‍थांमधून संताप व्यक्‍त होत आहे. कायम स्वरुपी वायरमन नियुक्‍त नसल्‍याने तांत्रिक अडचण निर्माण झाल्‍यास देखभाल दुरुस्तीसाठी घोसाळे, विरजोली या गावांतून वायरमनला बोलवावे लागते. पावसाळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्‍यामुळे विद्यार्‍थ्‍यांचेही नुकसान होते. दुर्गम भागातील गावे रोहा तालुक्यात समाविष्‍ट असली तरी दळणवळणासाठी मुरूड तालुका जवळ पडतो. त्‍यामुळे बाजारहाट, वैद्यकीय, शालेय सुविधांसाठी अनेकजण मुरूडमध्ये जातात. मात्र दीड-दोन महिन्यांपासून रोहा -केळघरमार्गे मुरूड ही एकमेव एसटी सेवाही बंद असल्याने दळणवळणात अडचणी येत आहेत. वाहतुकीची अन्य साधन नसल्याने पावसाळ्यात प्रचंड गैरसोय होत असल्‍याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

मुचणे गाव दुर्गम भागात असून वीजपुरवठ्‌यात तांत्रिक बिघाड झाल्‍यास, दुरुस्तीच्या कामात खूप अडथळे येतात. रविवारी सायंकाळी येथील काम पूर्ण झाले असून वीज पुरवठा सुरळीत आहे. या भागात काम करण्यासाठी वीज कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे दुरुस्तीच्या कामात विलंब होतो. या भागातील आयटीआय परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी असेल तर ठेका पद्धतीने त्याला नोकरी देण्यात येईल.
- रावसाहेब कापसे, उपअभियंता, वीजवितरण, घोसाळे

मुरूड ते केळघर हे अंतर १७ किमी असून पावसाळ्यात या मार्गावर दरडी पडण्याची भीती असल्यामुळे एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. या दुर्गम भागातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बस नसल्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे.
- अनंत गोरे, अध्यक्ष, रोहा तालुका धनगर समाज

प्रशासनाने रोह्यात दुर्गम भागातील १८ गावांमध्ये किमान अतिवृष्टी, संकट काळात तरी जागरूक राहून लक्ष देणे गरजेचे आहे. निवडणुकीत केवळ मतांपुरता आश्‍वासने दिली जात असल्‍याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्‍त होत आहे.
- धर्माजी हिरवे, अध्यक्ष, मुरूड तालुका धनगर समाज अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com