पेणवासीयांकडून लोकमान्य टिळकांच्या आठवणींना उजाळा

पेणवासीयांकडून लोकमान्य टिळकांच्या आठवणींना उजाळा

पेणवासीयांकडून लोकमान्य टिळकांच्या आठवणींना उजाळा
खटल्‍यातील बचावपक्षासाठी न्यायालयीन लढा

यशवंत तेरवाडकर ः सकाळ वृत्तसेवा
पेण, ता. ३१ : कोकणात विशेषतः तत्‍कालीन कुलाबा जिल्ह्यात १९१६-१७ च्या दरम्यान मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी प्राध्यापक शिवराम पंत परांजपे, दत्तोपंत आपटे व प्राध्यापक साठे यांनी कोकणच्या परिस्थितीवर जहाल वक्‍तव्य केल्‍याने इंग्रज सरकारने त्यांच्यावर खटला भरला होता. हा खटला पेण येथे असिस्टंट कलेक्टर ब्रूक्स यांच्या न्यायालयात सुरू होता. त्यांच्या बचावासाठी लोकमान्य टिळक १९१८ मध्ये पेणला आले होते. तत्‍कालीन आठवणी आजही पेणवासीयांच्या स्‍मरणात असून पिढ्यान्‌पिढ्या त्‍या सांगितल्‍या जात आहेत.
लोकमान्य टिळकांच्या भेटीच्या स्‍मृती पेणच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्‍या गेल्‍या आहेत. आजही त्या स्मृती पेणच नव्हे तर रायगड जिल्ह्याने जपल्या आहेत. त्या वेळी पेणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विनायक शिवराव धारकर हे होते. लोकमान्य टिळक पेणला येणार म्हणून नगराध्यक्ष धारकर व सर्व नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिकांनी खोपोली-पेण रस्त्यावर भोगावती पुलावर टिळकांचे भव्य स्वागत केले होते. लोकमान्यांना आणण्यासाठी खास बग्‍गी सजवली होती. मात्र लोकमान्यांप्रती आदर-श्रद्धा म्‍हणून बग्‍गीला घोडे न जोडता लोकांनीच ती ओढायला सुरुवात केली. ताशा, वाजंत्री, ढोल पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली, त्‍याचे नेतृत्‍व नगराध्यक्ष धारकर यांनी केले.
लोकमान्य टिळकांनी आग्रहाने धारकरांना आपल्या जवळ बसून घेतले. मिरवणूक बार भाई सभास्थानी येताच नगर परिषदेतर्फे टिळकांचा सत्कार करून त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी नागरिकांनी एकत्रित यावे, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्‍सव साजरी करावे, असे आवाहन करून पेण शहर हे कोकणातील पुणे असल्‍याचा उल्‍लेख केला होता. म्हणजेच पेण हे पुण्याप्रमाणेच कोकणचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र असल्‍याचे गौरवोद्‌गार यांनी काढले होते.

जनमानसात लोकमान्यांची उत्तम पकड
असिस्टंट कलेक्टर ब्रूक्स यांच्यापुढे चाललेल्‍या खटल्‍यात शिवराम पंत परांजपे, दत्तोपंत आपटे व प्राध्यापक साठे यांच्या बचावासाठी लोकमान्य टिळक त्या ठिकाणी गेले असता त्यांना पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय तंबूभोवती लोटला होता. ‘लोकमान्य टिळक महाराज की जय’ असा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. इतक्‍या गोंधळात खटला चालविणे अशक्य झाल्‍याने ब्रूक्सने टिळकांना जमावाला शांत करण्याची विनंती केली. लोकमान्य तंबू बाहेर येताच जमावाने आणखी जल्‍लोषात त्‍यांचा जय जयकार केला. टिळकांनी जमावास शांत राहण्याचे आवाहन केले. अखेर त्‍यांचा मान राखत जमाव शांत झाला. ब्रूक्सने टिळकांची जनमानसातील पकड, त्‍यांच्याप्रती असलेला आदर लागलीच ओळखला व परांजपेंसह इतर दोघांनाही दोष मुक्त करीत खटला तहकूब केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com