खड्ड्यामुळे अपघात झाल्‍यास गुन्हा दाखल होणार

खड्ड्यामुळे अपघात झाल्‍यास गुन्हा दाखल होणार

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३१ : कोकणची लाईफलाइन म्हणून ओळखला जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, ते गणेशोत्सवापूर्वी बुजवण्यात येऊन चाकरमान्यांना प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा आहे. रस्‍त्‍याच्या डागडुजीनंतरही खड्ड्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होत असेल तर संबंधित ठेकेदार आणि त्या विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
महामार्गावर पहिल्या टप्प्यात, पळस्पे ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास त्रासदायक होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासनाला आतापासूनच कामाला लागण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या आहेत. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी गेल्‍या पंधरा दिवसांपासून धुवाधार बरसात होत आहे. पळस्पे ते इंदापूरदरम्यान रस्‍त्‍याची चाळण झाली आहे. कोलाड ते वडखळदरम्यान तर रस्‍ता कमी आणि खड्‌डेच अधिक असल्‍याचे दिसून येत आहेत. त्‍यामुळे चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता, हेच समजत नाही. पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाला जणू काही तलावाचे स्वरूप आले आहे. त्‍यामुळे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याची मागणी प्रवासी तसेच वाहनचालकांकडून होत आहे.

दीड-दोन फुटाचे खड्डे
वडखळ - कोलाडदरम्यान गडब, आमटेम, कोलेटी, पळस, नागोठणे, वाकण, ऐनघर, सुकेळी खिंड, खांब, वरसगाव पुढे इंदापूरपर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यातून मार्ग काढणाऱ्या लहान वाहनांसह अवजड वाहनांच्या चालकांनाही जीवघेणी कसरत करावी लागते. चार ते सहा फूट रुंदीचे व एक ते दीड फूट खोलीच्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्‍याने अवजड वाहने कलंडल्‍याच्या अनेक घटना घडल्‍या आहेत.

अपघातांचे वाढते प्रकार
मुंबई-गोवा महामार्गावर पाच दिवसांपूर्वी नागोठणे-वाकण नाक्‍याजवळ खड्ड्यांतून वाट काढताना लोखंडी कॉईल वाहतूक करणारा ट्रेलर रस्त्यातच कलंडला. तर गुरुवारी (ता.२७)रात्री दहाच्या सुमारास नागोठणेजवळील कोलेटी नजीक कंटेनर वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला होता.

महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेस उशीर झाला आहे. हा उशीर का झाला, याची चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर खड्डे भरण्याच्या कामाला वेग येण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडत असतील तर त्यास संबंधित कंत्राटदार आणि त्या विभागाच्या अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल.
- उदय सामंत, पालकमंत्री, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com