मुदत संपली तरी पाणी योजना अपूर्णच

मुदत संपली तरी पाणी योजना अपूर्णच

नेरळ, ता. ३१ (बातमीदार)ः कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी वाडी असलेल्‍या ताडवाडीत मोठा गाजावाजा करीत जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू करण्यात आले. हे काम मे महिन्यात पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र ठेकेदाराची दिरंगाई आणि लघु पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षामुळे मुदत संपून दीड-दोन महिने झाले तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही.
कर्जत हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. दुर्गम भाग असलेल्या परिसरात उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ बसतात. तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीतील ताडवाडीत जवळपास अडिचशे कुटुंबे राहत असून लोकसंख्या ९०० च्या घरात आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो.
टंचाईवर मात करण्यासाठी ताडवाडी आणि लगतच्या मोरेवाडीत जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. मात्र मुदत संपली तरी कामे अपूर्णच आहेत. दरम्यान पाणीटंचाईमुळे महिलांना रात्री विहिरीवर झोपून काढावी लागत असल्याचे भीषण वास्तव दैनिक ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले होते. विधानपरिषदचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी कर्जतमध्ये दाखल होत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुजित धनगर यांच्याशी चर्चा करून वाडीसाठी तात्‍पुरते टँकर सुरू करण्यात आले होते. त्‍या वेळी पुढील ८ दिवसांत जलजीवन मिशन योजना कार्यान्वित होईल, असा शब्द लघु पाटबंधारे विभागाने दिला होता, मात्र दोन महिने उलटले तरी ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नाही. सद्यःस्थितीत योजनेच्या उद्भव विहिरीत पंप सोडण्यात येऊन विहीर ते मोरेवाडी जल साठवण टाकी व टाकी ते ताडवाडी अशी जलवाहिनी टाकण्यात आली आहेत. मात्र अद्याप गावात नळजोडणी करण्यात आलेली नाही. तसेच जलशुद्धीकरण केंद्राबाबतही स्पष्टता नाही. त्‍यामुळे पावसाळा संपताच पाण्यासाठी भटकंती करावी लागेल का, असा प्रश्‍न ताडवाडीतील ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.

नवीन अधिकारी घेणार का दखल?
रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासाठी जलजीवन मिशन योजना महत्त्वाची होती. यासाठी त्‍यांनी अनेकदा कठोर निर्णय घेत, ग्रामीण भागातील जनतेला आधार देण्याचा प्रयत्न केला. नुकतीच त्‍यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. भरत बस्टेवाड यांनी कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे ताडवाडीच्या लेटलतीफ कारभाराची डॉ. बास्टेवाड दखल घेणार का, असा प्रश्‍न ग्रामस्‍थांना पडला आहे.

ठेकेदाराने योजनेसाठी लागणाऱ्या जलवाहिनीची ऑर्डर दिली होती. मात्र सामग्री मिळण्यास उशीर झाल्याने योजनेचे काम अपूर्ण आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्‍न आहे.
- डी. डी. गावित, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे उपविभाग, कर्जत

ताडवाडीत पाणी येईल, असे दरवर्षी सांगितले जाते. मागच्या वेळी गावात नळही लावले, मात्र पाणी आलेच नाही. सरकारच्या भरवशावर किती बसायचे, हा प्रश्न आहे. गावात पाण्याचा त्रास असल्याने लग्‍नासाठी कुणी मुली द्यायलाही तयार होत नाहीत. आमचे संपूर्ण आयुष्‍य पाणी भरण्यात गेले.
- मीना तुकाराम आगीवले, ग्रामस्‍थ

प्रत्येक निवडणुकीला नेतेमंडळी गावात येतात आणि नळाद्वारे पाणी येईल, असे आश्‍वासन देतात. पण आमच्या आयुष्‍यात पाणी समस्‍या वर्षोनुवर्षे कायम आहे. उन्हाळ्यात बातमी वाचून पुढारी, अधिकारी आले. आणि आठ दिवसांत नळातून पाणी येईल सांगितले, पण अजून गावात नळ आले नाही. यंदा नळ आले नाही तर आम्ही वाडीचा मोर्चा काढू.
राही बिर्जू केवारी, महिला ग्रामस्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com