मालमत्ताकरावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा

मालमत्ताकरावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा

खारघर, ता. ३१ (बातमीदार) : पनवेल महापालिका प्रशासन, तसेच सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या सोयीनुसार सिडको वसाहतीमधील मालमत्ताधारकांवर दुहेरी मालमत्ता करप्रणाली लागू केली आहे. मात्र, कर प्रणाली लागू करताना पनवेल महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्र महापालिका अधिनियम १४९ चे कलम १२९ ‘अ’ ची सुमारे ६ टक्के कमी केलेल्या दराने लाभ देणारी तरतूद सिडको वसाहती मालमत्ताधारकांना लागू केली नसल्याने खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल करीत असल्याचा आरोप ‘कॉलनी फोरम’च्या अध्यक्ष लीना गरड यांनी केला आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम १२९ ‘अ’ मध्ये जिल्हा परिषदेच्या क्षेत्राचा शहरात समावेश झाल्यावर सामान्य कर लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. पालिका हद्दीतील ग्रामपंचायत आणि सिडको वसाहतीमधील खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा, पाचनंद, नावडे, रोडपाली, खांदा गाव, आसूडगाव, ओवेगाव, मुर्बी गाव आणि इतर ग्रामपंचायतींच्या, रायगड जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात समावेश होता. त्यामुळे कलम १२९ ‘अ’ सिडको वसाहतीमधील मालमत्ताधारकांना लागू मालमत्ता कर लावणे आवश्यक होते. मात्र, असे असताना सत्ताधाऱ्यांनी कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नसताना, सिडको वसाहत आणि गावठाण असा दुजाभाव करून खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल करून मालमत्ता कर वसूल करीत असल्याचा आरोप लीना गरड यांनी केला आहे.
----------------------------------------------------
काय आहे कलम १२९ ‘अ’
पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १ ऑक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत महापालिकेचा टॅक्स लागणार नाही; तर पुढील वर्षात महापालिकेच्या मालमत्ता कराच्या दरवर्षी २०, ४०, ६०, ८० आणि १०० टक्के मालमत्ता कर लागू करणे आवश्यक होते. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १४९ चे कलम १२९ ‘अ’ नुसार सिडको वसाहतीमध्ये १०० टक्के मालमत्ता कर आकारणी करण्याची तरतूद आहे.
-------------------------------------
ग्रामपंचायत काळातच दिलासा
पालिका अस्तित्वात येण्यापूर्वी काही ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात होत्या. सत्ताधाऱ्यांनी, ग्रामपंचायत प्रशासनाकडून सिडको वसाहतीमध्ये कोणत्याही सेवा-सुविधा दिल्या जात नसल्यामुळेच कायद्यात तरतूद असतानाही, केवळ नैतिकतेला धरून सिडको वसाहतीमधून मालमत्ता कर घेतला नाही.
--------------------------------------------
सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम १२९ ‘अ’ कडे दुर्लक्ष केले आहे. या कलमानुसार मालमत्ता कर कमी होऊ शकते. त्यामुळे सिडको वसाहतीमधील मालमत्ताधारकांनी पालिकेकडे आवर्जून हरकती नोंदवाव्यात.
- लीना गरड, माजी नगरसेविका
-------------------------------
गरड यांच्याकडून चुकीची माहिती दिली जात आहे. कलम १२९ ‘अ’ नुसार ग्रामपंचायत काळात मालमत्ता कर भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना हा नियम लागू होतो.
- अॅड. नरेश ठाकूर, माजी नगरसेवक
--------------------------------------
पालिकेने नियमानुसार मालमत्ता कर लागू केला आहे. ज्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांविषयी तक्रारी, हरकती आहेत, अशा मालमत्ताधारकांसाठी पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- गणेश शेट्ये, मुख्य लेखाधिकारी, पनवेल महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com