पनवेलमध्ये खड्डे विघ्न 
पनवेलमध्ये खड्डे विघ्न

पनवेलमध्ये खड्डे विघ्न पनवेलमध्ये खड्डे विघ्न

पनवेल ता.३१(बातमीदार)ः मुसळधार पावसामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते, औद्योगिक, सिडको तसेच गावागावांना जोडणाऱ्या जिल्हापरिषदेच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पनवेल महापालिकेने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मान्सूनपूर्व केलेला १३ कोटींचा खर्च वाया गेला आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात पावसाळ्यात साधरणपणे ३ हजार मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु, यंदा वीस ते पंचवीस दिवसात जवळपास २ हजार ६०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रातील रस्त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधून पालेगावातून चिंध्रण गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड माती वाहून गेल्याने दोन ते तीन फूट पाणी साचलेले आहे. अशीच परिस्थिती पनवेल महापालिका क्षेत्रात जवाहर इंडस्ट्रीज आणि पनवेल इंडस्ट्रिअल इस्टेट या दोन्ही औद्योगिक सोसायटीची झाली आहे. या सोसायट्यांमधील दोनशेहून अधिक कारखान्यांपर्यंत शिरण्यासाठी अंतर्गत रस्ते वाहनांसाठी धोकादायक बनले आहेत. हीच अवस्था कळंबोलीतील लोखंड पोलाद बाजारातील अंतर्गत रस्त्यांची आहे. कळंबोली वसाहतीमधील रोडपाली तलाव ते केएलई महाविद्यालय रस्ता खड्यांनी भरला आहे. तसेच डीमार्ट दुकानामागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनालगतचा रस्ता अवजड वाहने सतत उभी केल्याने दयनीय अवस्थेत आहे.
-------------------------------------------------
पाठदुखीच्या रूग्णांमध्ये वाढ
रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहन चालवताना चालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नाही. विशेषतः दुचाकी खड्ड्यात आदळली तर वाहनचालकाचा तोल गेल्याने अपघाताच्या घटना दररोज घडत आहेत. तर अनेकदा खड्ड्यांमध्ये वाहन आदळल्याने दुचाकी चालकांच्या कमरेला झटका बसत असल्यामुळे अनेकांना पाठीचे तसेच मानदुखीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
----------------------------------------
गॅरेजवाल्यांचा धंदा तेजीत
पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये आदळून चारचाकी, दुचाकी वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे दुचाकींच्या दुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. तर, चारचाकी वाहनांना खड्ड्यांमुळे बिघाड होऊन तांत्रिक नुकसानीने प्रकार समोर येत आहेत. याच बरोबर खड्ड्यांमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात गाडीचे चाक आदळल्याने गाडीच्या टायर कट लागणे, टायर फुटणे, वाॅल्व निकामी होण्याचे प्रकार घडत असल्याने दुचाकी चारचाकीसह अवजड वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
-------------------------------------------
पावसाळा सुरू असल्यामुळे डांबरीकरणाचे काम करणे शक्य नाही. या कालावधीत वाहतूक सुरळीत राहावी म्हणून खड्ड्यांमध्ये खडीकरण तसेच पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने रस्ते दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच पावसाळ्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल.
-संजय कटेकर, अभियंता, पनवेल पालिका
-------------------------------------
पावसामुळे वाहने बंद पडण्याचे प्रकार वाढतात. तर खड्ड्यांमुळे वाहने आदळून दुरुस्तीसाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे.
-समीर वचकल, गॅरेज व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com