तीन हात नाक्याचा भार हलका

तीन हात नाक्याचा भार हलका

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाण्याहून मुलुंड पश्चिममार्गे मुंबई गाठण्यासाठी तीन हात नाका सिग्नलचा येणारा अडथळा आता दूर होणार आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ एमएसआरडीएने बांधलेल्या भुयारी मार्गाचा पर्याय या मार्गावरील प्रवाशांसाठी उपलब्ध झाला आहे. या सुमारे ३६.७५ मीटर आणि २१.२० मीटर रुंद असलेल्या या चौपदरी भुयारी मार्गातून छोटी वाहने आणि बस धावणार आहेत. त्यामुळे कोपरी पूर्व ते मुलुंड माॅडेला चेकनाका असा प्रवास अवघ्या १० मिनिटांवर येणार आहे. पर्यायाने तीन हात नाक्यावरील भार हलका होण्यासही मदत होणार आहे.
तीन हात नाका हा ठाणे शहरातील सर्वात गजबजलेला भाग असून या ठिकाणच्या सहा रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे. दररोज लाखो वाहने येथून ये-जा करत असल्याने येथे कायम वाहतूककोंडी होत असते. त्यातून मार्ग काढताना प्रत्येक वाहनाची किमान तीन ते चार मिनिटे खर्ची पडतात. कधी कधी हा विलंब १० ते १५ मिनिटांपर्यंतही जातो. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार ट्रिपल डेकर उड्डाणपुलापासून ते ग्रेड सेपरेटर अशा अनेक पर्यायांची चाचपणी झाली. पण त्याला यश मिळाले नाही. त्यातच कोपरी उड्डाणपुलाची मजबुती आणि रुंदीकरणाचे काम एमएसआयडीएने हाती घेतले. यावेळी कोपरी पूर्व ते मुलुंड पश्चिम चेकनाकापर्यंत भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
भुयारी मार्गाच्या कामाचा २०१८ साली कार्यादेश काढण्यात आला. त्याचे काम जुलै २०२३ मध्ये पूर्ण झाले आहे. या भुयारी मार्गाची लांबी ३६.७५ मीटर इतकी आहे. तर रुंदी २१.२० मीटर आहे. चार मार्गिका आणि फुटपाथ अशी या भुयारी मार्गाची रचना आहे. विशेष म्हणजे या भुयारी मार्गातून ४ मीटर उंचीच्या हलक्या वाहनांसह परिवहनच्या बसही धावणार आहेत. त्यामुळे कोपरीसह ठाणे पूर्व भागातून मुलुंड दिशेला जाणाऱ्या वाहनांना यापुढे तीन हात नाक्यापर्यंत येण्याची किंवा सिग्नलमुळे खोळंबण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे खर्ची होणारा अर्धा ते पाऊण तासांचा वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे.
…..
सिग्नलपासून मुक्ती
तीन हात नाकाचा सिग्नल म्हणजे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मध्यंतरी यावर उपाय म्हणून एकदिशा मार्ग सुरू झाला. पण हा प्रयोग फसला. मात्र या भुयारी मार्गामुळे ठाणे पूर्व ते मुलूंड पश्चिम दिशेला जाणाऱ्या वाहनांना सिग्नलपासून मुक्ती मिळणार आहे. याशिवाय ज्ञानसाधना महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी घालावा लागणारा वळसा टळणार आहे. ब्राह्मण सोसायटी, गोखले रोड, विष्णू नगर या भागातील रहिवाशांनाही या भुयारी मार्गाचा वापर करता येणार आहे.
…...
पुढचा टप्पा नवीन स्थानक
भुयारी मार्गाला लागूनच आणखी रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यातील उजव्या बाजूचा रस्ता प्रस्तावित नवीन ठाणे स्थानकाला जोडला जाणार आहे. तर डाव्या बाजूचा रस्ता तीन हात नाकाला जोडण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com