महसुली उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक

महसुली उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक

प्रशांत कांबळे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : एसटीच्या सुरक्षित प्रवासाला नागरिकांनी पसंती दिल्याने महामंडळाची तिजोरी भरलेली असायची; मात्र गेल्या सहा वर्षांत एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला घरघर लागल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. २०१७ मध्ये एसटीचा संचित तोटा ३६६३.२१ कोटी रुपये होता. सहा वर्षांमध्ये हा तोटा तिप्पट वाढून ९१७६.७४ कोटींवर पोहचला; तर चालू आर्थिक वर्षात हा तोटा चारपट होऊन ११४८३.४१ कोटींवर गेल्याने एसटी महामंडळासमोर नवे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने राज्य सरकारला आपल्या आर्थिक बाबींचा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये संचित तोट्याचा खुलासा केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त झाल्याची नोंद आहे. यामध्ये ८७७४.६५ कोटींचे उत्पन्न झाले; मात्र कर्मचारी वेतन आणि इतर आर्थिक लाभ, इंधन, भांडार सामान, मोटार वाहन कर, पथकर, घसारा, व्याज आणि सर्वसाधारण प्रशासकीय खर्च मिळून खर्च ९७१४.१९ कोटींवर गेला आहे. त्यामुळे महसुलात ९३९.५४ कोटींचा तोटा झाला आहे. गेल्या सात वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतरही आर्थिक लाभांवर पहिल्यांदा ३८५६.६० कोटींचा सर्वाधिक खर्च; तर इंधनावर ३६१२.९३ कोटी रुपये खर्च झाला आहे.

तोटा आणखी वाढणार!
एसटी महामंडळाने आपल्या आर्थिक अहवालात २०२३-२४ मध्ये संचित तोटा वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यात ९७६६.७२ कोटींचे उत्पन्न होईल आणि १०६८१.३९ कोटींचा खर्चाचा अंदाज काढण्यात आला आहे. त्यामुळे ९१४.६७ कोटींचा महसुलात तोटा आणि पूर्वकालीन समायोजनासाठी १३९२ कोटींचा खर्च असल्याने एकूण २३०६.६७ कोटींचा तोटा होणार आहे. त्यामुळे एकूण संचित तोटा ११४८३.४१ कोटींवर पोहचण्याचा अंदाज एसटी महामंडळाने वर्तवला आहे.

सात वर्षांतील उत्पन्न आणि खर्च (कोटींमध्ये)
वर्ष एकूण जमा एकूण खर्च तोटा
२०१७-१८ ७१६८.१ ८१९६.२७ १०२७.२६
२०१८-१९ ८१२०.२३ ९०६८.६८ ९४८.४५
२०१९-२० ७८७०.९९ ८७९०.२० ९१९.२१
२०२०-२१ ४२२३.५० ५८१४.१५ १५९०.६५
२०२१-२२ ३९००.५१ ५०९८.११ ११९७.६०
२०२२-२३ ८७७४.६५ ९७१४.१९ ९३९.५४
२०२३-२४ (अंदाज) ९७६६.७२ १०६८१ ९१४.६७


यावर होतो सर्वाधिक खर्च (कोटींमध्ये)
वर्ष कर्मचारी वेतन व आर्थिक लाभ इंधन प्रशासकीय खर्च
२०१७-१८ ३७८८.९९ २५३१.१ २४९.२०
२०१८-१९ ३७८७.९२ ३०१३.६७ ४४५.५६
२०१९-२० ३७८१.७६ २८०१.९६ ४४९.११
२०२०-२१ ३३२५.४० १४२७.११ २५९.१९
२०२१-२२ २५३८.५५ १४९०.१९ २६२.५१
२०२२-२३ ३८५६.६० ३६१२.९३ ८६१.२४
२०२३-२४ (अंदाज) ४१७८.८१ ३९८८.६५ ९७८.५४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com