रायगड

रायगड

आरोग्‍य कर्मचाऱ्यांच्या वेतनास विलंब
संसाराचा गाडा चालवताना आर्थिक ओढाताण

रोहा, ता. २१ (बातमीदार) ः रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना महिन्याची २० तारीख उलटून गेली तरी अद्याप वेतन (पगार) मिळालेले नाही. त्‍यामुळे संसाराचा गाडा चालवताना कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. सरकारने याप्रकरणी दखल घेत लवकरात लवकर लवकर मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्‍य विभागात जवळपास ४०० कर्मचारी वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा होते, मात्र ऑगस्‍ट महिन्याची २१ तारीख उलटून गेली तरी वेतन जमा झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे महिन्याची बजेट कोलमडले आहे. महिन्याचे रेशन, मुलांचे शालेय शुल्‍क, घराचा हप्ता, विम्‍याचा हप्ता आदी थकल्‍याने कर्मचारी तणावात आहेत. महिनाभर काम करूनही मेहनतीचा मोबदला वेळेवर मिळत नसेल तर काय उपयोग, असा प्रश्‍न कर्मचारी विचारत आहेत.

कर्मचारी वेतन वितरण विभागातील अधिकाऱ्यांची अंतर्गत बदली झाली आहे. नवीन अधिकाऱ्यांकडून कामाचे स्‍वरूप समजून घेण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. त्‍यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन मिळण्यास काही दिवस विलंब झाला आहे. शुक्रवारी (ता.१८) आरोग्य अधिकारी मनीषा व्हि.के. यांनी या संदर्भात बैठक घेतली असून आठवडाभरात सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन खात्यात जमा होतील.
- नरेश नागवेकर, आरोग्य सहायक, रायगड जिल्हा परिषद

.........................

पळस्पे-इंदापूर काँक्रीटीकरणाला गती
गणेशोत्सवापूर्वी कासूपर्यंत एक लेन पूर्ण करण्याचा प्रयत्‍न

पेण, ता. २१ (वार्ताहर) : मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम १३ वर्षांपासून संथगतीने होत आहे. महिनाभरावर आलेल्‍या येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या काँक्रीटीकरणाला गती देण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. एकीकडे पळस्पे ते इंदापूर पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे तर पनवेल ते पेण दरम्यानचा मार्गही सुस्‍थितीत करण्यात येत आहे, मात्र पेण ते इंदापूरपर्यंत महामार्गाची स्‍थिती दयनीय आहे. महामार्गालगतचे अंतर्गत रस्‍त्‍यांचीही चाळण झाल्‍याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गणेशोत्सवापूर्वी पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील एक लेन कासूपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्‍टीने कामे वेगात सुरू आहेत.
पेण तालुक्यातील तरणखोप, रामवाडी, उचेडे, वाशीनाका, वडखळ, डोलवी, खारपाले, कोलेटी यासह पुढे नागोठणे, कोलाड, माणगाव, इंदापूरपर्यंत ठिकठिकाणी रस्‍त्‍याची चाळण झाली आहे. दरवर्षी गणेशोत्सवात गावी जाताना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागतो, यंदा प्रशासनासह लोकप्रतिनिधी, अनेक मंत्र्यांनी महामार्गाची पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्‍तीचे कामे करण्याचे आदेश दिले आहेत, त्‍यामुळे यंदा प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा अशी अपेक्षा भीमकांत कोळी या वाहनचालकाने व्यक्‍त केली आहे.

मुंबई - गोवा महामार्गावर पळस्पे ते कासू दरम्‍यान काँक्रीटीकरणात एका लेनचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्‍न आहे. त्‍यासाठी जास्‍त मशिनरी वापरल्‍या जात आहेत. कासू ते इंदापूर टप्प्यामध्ये वेगळे तंत्र वापरून वेगाने काम पूर्ण करण्यात येत आहे.
- यशवंत घोटकर, अधिकारी, महामार्ग प्राधिकरण
................

विरोधी पक्ष नेते करणार महामार्गाची पाहणी!
जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबेंनी घेतली विरोधी पक्षनेत्‍यांची भेट
माणगाव (वार्ताहर) ः मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी संपता संपत नाही. काही ठिकाणी कामे संथगतीने तर काही ठिकाणी बंदच आहेत. महामार्गावरील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मोऱ्या, बायपास यासारखी अनेक कामे बाकी आहेत. पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडल्‍याने चालकांसह नागरिकांना प्रवास नकोसा होत आहे. रखडलेल्‍या महामार्गाची पाहणी करण्यासाठी दौरा करणार असून सरकारला जाब विचारणार असल्‍याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी नुकतीच वडेट्टीवार यांची
विधानसभेत भेट घेत महामार्गाच्या समस्‍यांबाबत चर्चा केली. श्रीवर्धन विधानसभा माजी आमदार शाम सावंतही या वेळी उपस्थित होते. दक्षिण रायगडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या समस्या, पक्षबांधणी, आगामी निवडणुका आदी विषयांवरही लवकरच बैठक घेणार असल्‍याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

----------

पोलिसांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार
पहिल्‍या टप्प्यात २०० घरे; पंधरा दिवसांत निविदा प्रक्रिया
अलिबाग, ता. २१ (बातमीदार) ः पोलिस मुख्यालयातील जीर्ण घरांच्या जागी नवीन संकुल उभारण्यात यावे, असा प्रस्‍ताव सरकारदरबारी अनेक वर्षांपासून पडून होता. मात्र रखडलेल्या प्रस्‍तावाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात पोलिसांसाठी २०० घरे बांधली जाणार आहेत. येत्या पंधरा दिवसात निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती पोलिस दलाकडून देण्यात आली आहे.
रायगड पोलिस दलाच्या हद्दीत २८ पोलिस ठाणे, आठ पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालये, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा वाहतूक शाखा, जिल्हा विशेष शाखा, सायबर सेल, सुरक्षा शाखा असे विभाग येतात. जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे २० लाख असून त्‍यांच्या सुरक्षेसाठी दोन हजार ३३० पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्‍यात १५० अधिकारी व दोन हजार १८० अंमलदारांचा समावेश आहे.
अलिबाग येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानासमोर बैठ्या घरांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. ही बैठी घरे जुनी असल्याने मोडकळीस आल्‍याने त्याजागी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठवण्यात आला होता. जीर्ण झालेली घरे पाडून अनेक वर्षे उलटून गेली, तरी नवे घर उभारणीच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नव्हत्‍या. अनेक वर्षे प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारदरबारी पडून होता. त्‍यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्‍त होत होती. मात्र लवकरच नवीन वसाहतीचे बांधकाम सुरू होण्याची शक्‍यता आहे.
घरांच्या मंजुरीसाठी सरकारकडे पाठविलेल्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आहे. पोलिस मुख्यालयात एकूण ३८० घरे उभारली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली. प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काचा निवारा मिळणार आहे.

पोलिस मुख्यालयाकडून कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्‍याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. निविदा प्रक्रिया १५ दिवसांत सुरू केल्या जातील. पहिल्या टप्प्यात २०० घरांचा प्रस्तावित प्रकल्प आहे.
- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, रायगड
---------------------


म्हसळ्यात गॅस शवदाहिनी पडून
स्मशानभूमीत एक कोटींचे साहित्य विनावापर

श्रीवर्धन, ता. २१ : म्हसळ्यातील स्मशानभूमीत नगरपालिकेने ९० लाख रुपये खर्चून गत वर्षी डिसेंबरमध्ये गॅस शवदाहिनी उभारली, मात्र विद्युत जोडणी अभावी ती बंदच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वापराविना शवदाहिनीवरील लाखोंचा खर्च वाया गेल्‍याचे चित्र आहे.
मार्च अखेरपासून शहरात जवळपास ५० हून अधिक मृत्यूंची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. वृक्षतोड, प्रदूषण व लाकडांची कमतरता तसेच अंत्यविधीसाठी होणारा खर्च कमी व्हावा, याकरिता स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी उभारण्यात आली. यामुळे प्रदूषण कमी होते, शिवाय बाहेर पडणारा धूर मोठ्या चिमणीच्या साह्याने १०० फूट उंचीवर सोडला जात असल्‍याने नागरी वस्तीतील प्रदूषण रोखण्यास मदत होते. २४ तासांत १२ शव दहन करता येतील, अशी व्यवस्था याठिकाणी आहे. मात्र सद्यःस्थितीत वापराविना गॅसदाहिनीचे रेग्युलेटर व इतर साहित्य गंज लागून खराब होत आहे.

स्मशानात २५ लाखांची मशीन
म्हसळा नगरपंचायतने कोव्हिड फंडातून प्लास्टिक कचरा जाळायची मशीन खरेदी केली. विशेष म्हणजे नगराध्यक्ष व तत्कालीन मुख्याधिकारी यांनी संगनमताने खरेदी केलेल्या हा मशीनचा वापरच झाला नाही, उलट ती प्लास्टिकमध्ये बांधून स्मशानात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

येत्या पंधरा दिवसांत गॅस शवदाहिनी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. विद्युत जोडणी व तत्सम कामे हाती घेण्यात आली असून लवकरच पूर्ण होतील.
- विराज लबडे, प्रभारी मुख्याधिकारी, म्हसळा

विद्युत जोडणी न झाल्याचे गॅस शवदाहिनी बंद आहे. ती लवकरच सुरू करू. प्लास्टिक जाळायची मशीन ही केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ योजनेतून देण्यात आली आहे, मात्र डम्पिंग ग्राउंडमुळे ते सुरू झालेले नाही. पावसाळ्यानंतर या मशिन कार्यान्वित करू.
- असहल कादिरी, नगराध्यक्ष

.................

शवदाहिनीसाठी गॅस सिलिंडरची प्रतीक्षा
उद्‌घाटन लांबणीवर

मुरूड, ता. २१ (बातमीदार) ः मुरूडमधील वैकुंठभूमीत सुमारे एक कोटी खर्चून
शवदाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले. गॅसवर चालणाऱ्या शवदाहिनीमुळे लाकडांचा वापर टाळून वायूप्रदूषण टाळले जाणार आहे. अलिबाग - मुरूड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी, निधी उपलब्ध करून दिल्याने तत्परतेने यंत्रणा बसवण्यात आली. मात्र गॅस सिलिंडरच उपलब्ध होत नसल्याने शवदाहिनीचा लोकार्पण सोहळा रखडल्‍याचे समोर येत आहे.
शवदाहिनीचे काम जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण झाले आहे, मात्र त्‍यासाठी किमान २० गॅस सिलिंडरची गरज असून हा व्यवहार उधारीवर होत नसल्याने लोकार्पण सोहळा रखडला आहे. गॅस एजन्सीने उधारीवर सिलिंडर देण्यास मुरूड नगरपरिषदेला नकार दिल्‍याने रोख रक्‍कम देण्याशिवाय पर्याय नाही.
शहरातील सुधा गॅस वितरण व्यवस्थेचे प्रमुख तथा सुपारी खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष अविनाश दांडेकर यांच्याकडे विचारणा केली असता, नगरपरिषदेकडून गॅस सिलिंडर क्रेडिटवर देण्याची विचारणा झाली होती. परंतु गॅस सिलिंडरचे व्यवहार रोख रकमेत होत असल्याने उधारीवर पुरवठा शक्य नसल्याचे स्पष्ट केले. तर मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी लवकरच गॅस शवदाहिनीचे लोकार्पण करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com