बेटेगाव पोलिस ठाण्याची मागणी

बेटेगाव पोलिस ठाण्याची मागणी

बोईसर, ता. २१ (बातमीदार) : बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता येथील पोलिस ठाण्यातील मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे समोर आले आहे. बोईसर शहराची वाढती लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती येथील औद्यागिक क्षेत्र लक्षात घेता बेटेगाव येथे नवीन पोलिस ठाण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सध्याच्या बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोईसर शहरी भागासोबतच पूर्वेकडील ग्रामीण भाग समाविष्ट असून लोकसंख्या अंदाजे चार लाखांपेक्षा अधिक आहे. येथील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये सातत्याने घडणारे स्फोट, आग, वायुगळती आणि इतर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा वेळी पोलिस कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलासोबत स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. त्याचप्रमाणे वेळोवेळी होणाऱ्या कामगार आंदोलनाच्या वेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांची कसोटी लागते. एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत औद्योगिक वसाहतीसह लगतच्या बोईसर, (दांडीपाडा) सरावली, खैरापाडा, कोलवडे, कुंभवली, सालवड, बेटेगाव, मान आणि वारांगडे या मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या ग्रामपंचायतींसह पूर्व भागातील सूर्या नदी अल्याड गावांचा समावेश आहे. एका बाजूला शहरी भाग, तर दुसऱ्या बाजूला दुर्गम डोंगराळ भाग अशा विपरीत परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारी रोखण्याचे काम पोलिसांना करावे लागते. पोलिस ठाण्यामध्ये एकूण गुन्ह्यांपैकी महिन्याला ३५ ते ४० टक्के गंभीर गुन्ह्यांची नोंद होत असून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

सध्याच्या एमआयडीसी पोलिस ठाणे अंतर्गत औद्योगिक परिसर, कोलवडे, कुंभवली, सालवड हा भाग कायम ठेवून नवीन बोईसर पोलिस ठाणेअंतर्गत उर्वरित बोईसर, सरावली, खैरापाडा, बेटेगाव, मान, वारांगडे, राणीशिगाव, नेवाळेसहित रेल्वेच्या पूर्वेकडील सूर्या नदीच्या हद्दीपर्यंत असलेली गावे समाविष्ट केल्यास सध्याच्या पोलिस ठाण्यावरील भार बराचसा हलका होऊन पोलिसांच्या तपासाच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होऊ शकते, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

नवीन प्रकल्प
बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे, यासाठीचे भूसंपादन, बोईसर पूर्वेला होणारे मुंबई-अहमदाबाद हायस्पीड मार्गावरील बुलेट ट्रेनचे स्थानक यामुळे बोईसर पोलिस ठाण्यावर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त ताण पडणार आहे.


...
उपलब्ध असलेल्या पोलिस मनुष्यबळानुसार नियोजनकरता बीटप्रमाणे एक ते दोन अधिकारी नेमले गेले आहेत. सोबतच ३ ते ४ वाहने नाकाबंदी पेट्रोलिंगसाठी पाठवली जातात.
- उमेश पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बोईसर
..
बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेटेगाव येथे नवीन पोलिस ठाणे व्हावे, यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच रिक्त जागा भरण्यात येतील. सध्या वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाढीव पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक लवकरच करणार आहोत.
- बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक, पालघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com