फलकबाजीने चालकांची दिशाभूल

फलकबाजीने चालकांची दिशाभूल

पनवेल, ता. २१ (बातमीदार)ः सायन-पनवेल महामार्गावरील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कळंबोली सर्कलजवळील पादचारी पुलाचा वापर सध्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून फलकबाजीसाठी केला जात आहे. या बेकायदा फलकांनी वाहनचालकांसाठीचे दिशादर्शक फलक झाकले गेले असून त्यामुळे परराज्यांतील वाहनचालकांची तारांबळ उडत आहे.
महापालिकेच्या परवानगीशिवाय होर्डिंग आणि बॅनर लावू नयेत, असे मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही बेकायदा होर्डिंग, बॅनर, नामफलक, पोस्टर्स, फ्लेक्स लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली मॅक्डोनाल्डसमोरील पादचारी पुलावरील दिशादर्शक फलकावर राजकीय, तसेच धार्मिक कार्यक्रमांची फलकबाजी केली जात आहे. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील महत्त्वाचे प्रवासी थांबा असलेल्या या ठिकाणावरून घाटमाथ्यावर दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात; परंतु मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग संपल्यानंतर मुंबईमध्ये प्रवेश करताना समोर दिशादर्शक फलकावर लावलेल्या बेकायदा जाहिरातींमुळे इच्छित स्थळी जाण्याची दिशाच वाहनचालकांना दिसत नसल्यामुळे गोंधळ उडत आहे. परिणामी, अनेक वेळा वाहतूक कोंडी, तसेच किरकोळ अपघातांचे प्रकारही घडले
आहेत. मात्र महापालिका क्षेत्रातील इतर भागांत बेकायदा फलक काढण्यास कार्यतत्पर असलेली महापालिका सायन-पनवेल महामार्गावरील फलकांविरोधात दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी आहे.
----------------------------------------------------
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग संपल्यानंतर घाटमाथ्यावरील वाहनचालकांसाठी मुंबई सुरू होत असते; परंतु द्रुतगती महामार्ग संपल्यानंतर समोर मुंबईमधील उपनगरे, तर इतर ठिकाणची माहिती बॅनरखाली झाकलेली असते. त्यामुळे अनेकदा गोंधळ उडतो.
- बसप्पा कडेमनी, ट्रकचालक, कर्नाटक
------------------------------------------
पनवेल महापालिका क्षेत्रात कुठेही बॅनर लावायचे असतील तर तशी पालिकेच्या परवाना विभागाकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली येथील पादचारी पुलावरील दिशादर्शकावर बेकायदा फलकबाजी होत असेल तर कारवाईच्या सूचना दिल्या जातील.
- जयराम पादीर, परवाना विभाग प्रमुख, पनवेल महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com