समस्यांचा पाढा संपेना

समस्यांचा पाढा संपेना

वसई, ता. २१ (बातमीदार) : वसई-विरार शहरात नागरीकरणाबरोबरच समस्यांचा डोंगरही उभा राहत आहे. एकीकडे मालमत्ता कराची अव्वल वसुली झाली असताना करदात्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. नादुरुस्त गटारे, अस्वच्छता, रस्त्यावर खड्डे व पाण्याची समस्या सतावत असून, प्रशासकीय राजवटीवर नाराजी व्यक्त होत आहे.

वसई-विरार शहरात महापालिकेकडून मूलभूत सुविधा पुरविल्या जातात. मात्र सद्यस्थितीत समस्यांनी घेरले आहे. पावसाळ्यापूर्वी गटारांची दुरुस्ती, नवीन गटारे उभारली असली तरी गटारांची अवस्था बिकट आहे. रस्त्यावरील गटारे ही वाहतुकीला अडचण ठरत आहेत, तर अपघाताला निमंत्रण देत आहेत. ज्या ठिकाणी दुरवस्था आहे, तिथे काठ्या किंवा कचराकुंड्या ठेवल्या जात आहेत, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. शहरासह ग्रामीण भागातील गावांमध्ये खड्ड्यांचे जाळे वाढतच आहे; परंतु याबाबत प्रशासकाने अद्याप दखल घेतली नसल्याने खड्ड्यांतून प्रवास करताना शारीरिक दुखणे वाढत आहे, तसेच वाहनांचे अपघातही होतात. सणासुदीच्या उंबरठ्यावर वसई-विरार शहरातील मार्ग खडतर झाले आहेत.

शहर सुंदर दिसावे, म्हणून सौंदर्यीकरण केले जात आहे, मात्र शहरातील नागरिकांना हव्या असणाऱ्या मूलभूत सुविधा अपूर्ण आहेत. प्रशासनाकडून देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने समस्यांचा पाढा काही केल्या संपत नाही. त्यामुळे प्रशासनाने सुविधा द्याव्यात, अशी मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे.

पाण्याची समस्या
सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली. प्रशासकाने लवकरच पाणी मिळेल, अशी घोषणा केली; परंतु अद्याप कार्यवाही झाली नाही. अशातच पुरवठा होणारे पाणीही कमी येत असल्याने नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी अनेक समस्या भेडसावत असल्याने प्रशासकाचा समाचार काही दिवसांपूर्वी घेतला होता.

अस्वच्छतेमुळे आरोग्याची ऐशी-तैशी
वसई-विरार शहरात लोकवस्तीत कचऱ्याचे ढीग निर्माण होतात. पावसाळ्यात साथीचे आजार बळावत असल्याने कचऱ्यामुळे आरोग्याची समस्या डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छ शहराचा नारा आणि शून्य कचरा मोहिमेचा निर्धार जरी प्रशासन करत असले, तरी मात्र अस्वच्छतेचा बोजवारा दिसून येतो.

वाहतुकीचा खोळंबा
पावसाळ्यात वाहतुकीला मोठा फटका सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागतो. अत्यावश्‍यक सेवा आणि सर्वसामान्य नागरिकांना रोज फटका बसत आहे. शहरात उड्डाण पुलाचे दाखवलेले स्वप्न अद्यापही अपूर्णच आहे.

नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असतात, मात्र महापालिका प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. केवळ सुशोभीकरण करून प्रश्न सुटणार नाही, तर मूलभूत सुविधा करदात्यांना मिळाव्यात, ही माफक अपेक्षा पालिकेने पूर्ण करावी.
- महेश सरवणकर, अध्यक्ष, वसई रोड, भाजप

वसई-विरार शहरातील खड्डे बुजवण्याचे काम गणेशोत्सवापूर्वी हाती घेण्यात येईल. ज्या ठिकाणी गटारे नादुरुस्त आहेत, त्यांची पाहणी करून संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना सूचना देऊन कार्यवाही करण्यात येईल.
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com