मोबाईल चोरांची रविवारी हातसफाई

मोबाईल चोरांची रविवारी हातसफाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीनिमित्त खरेदीसाठी रविवारी (ता. २०) घराबाहेर पडलेल्या मुंबईसह उपनगरवासीयांना मेगाब्लॉकमुळे गर्दीतून प्रवास करावा लागला; मात्र याच गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला. मुंबईत रविवारी ३२ मोबाईल चोरीला गेल्याची नोंद झाली; तर रविवारी दिवसभरात तब्बल ४० चोरीच्या घटना घडल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रेल्वेकडून दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. या ब्लॉक कालावधीत लोकलची संख्या कमी असते. त्यामुळे लोकल आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे याच गर्दीचा फायदा घेऊन चोरांकडून मोबाईल, बॅग, पॉकेट लंपास केले जातात. या घटना कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे. खरेदीनिमित्त तसेच पर्यटनासाठी रविवारीही बाहेर निघालेल्या प्रवाशांना मोबाईल चोरांनी दणका दिला. दिवसभरात चोरीच्या ४० घटना घडल्या; यापैकी पाच उघडकीस आणण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे; तर ३२ मोबाईल चोरीला गेले आहेत.

रविवारच्या चोरीच्या घटना

चोरी सामान गुन्हे उघडकीस
मोबाईल ३२ ०५
बॅग, पिशवी ०४ ००
पर्स, पॉकेट ०२ ००
सोन्याची चेन ०२ ००
एकूण ४० ०५
----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com