सतरा दिवसांच्या बाळाचा सौदा

सतरा दिवसांच्या बाळाचा सौदा

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : मुंबईतील मानखुर्द येथे राहणाऱ्या एका महिलने मध्यस्थांच्या मदतीने आपल्या १७ दिवसांच्या बाळाला अडीच लाख रुपयांमध्ये विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना खारघरमध्ये उघडकीस आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला पथकाने शनिवारी (ता. १९) खारघरमध्ये सापळा रचून लहान बाळ विकण्यासाठी आलेल्या आईला तसेच बाळ विक्रीसाठी मध्यस्थी करणाऱ्या आठ जणांना अटक केली आहे.
बाळाची आई मुमताज रहेमान मंडळ (वय २८, रा. मानखुर्द, महाराष्ट्र नगर) हिच्यासह मध्यस्थी करणारे मुमताज नियाज अब्बास खान (वय ४८), नदिम शाहिद अहमद अन्सारी (वय २९), गुलाम गौस अहमद अन्सारी (वय ३७), सुरेश शामराव कांबळे (वय ६०, सर्व रा. मुंब्रा) तसेच जुबेदा सैयद रफिक (वय ४९), शमिरा बानु मोहद्दीन शेख (वय ४२, दोघेही रा. चिता कॅम्प, ट्रॉम्बे) व दिलशाद आलम (वय ४२, रा. बांद्रा, खेरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

---------------
असा केला भंडाफोड
१. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका महिलेच्या माध्यमातून मुले विक्री करणाऱ्या टोळीशी व्हॉट्सॲपवरून संपर्क ठेवला होता. पोलिसांच्या पथकाने लहान मूल खरेदीबाबत चौकशी केल्यानंतर या टोळीने अडीच लाख रुपयांमध्ये नवजात बाळ विकत देण्याची तयारी दर्शवली होती.
२. पथकाने लहान मूल विकत घेण्याची तयारी दर्शवून त्यांना खारघर येथे बोलावून घेतले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर व त्यांच्या पथकाने शनिवारी दुपारी खारघर सेक्टर २१ मधील सिद्धी विनय बिल्डिंगजवळ सापळा रचला होता.
३. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास टोळीतील मुमताज खान, रिक्षा चालक नदीम अन्सारी व बाळाची आई मुमताज मंडळ हे तिघेही १७ दिवसांच्या बाळाला घेऊन रिक्षामधून खारघरमध्ये आले होते.
४. बाळाच्या खरेदी-विक्रीचे अडीच लाख रुपये त्यांना दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करून मुंब्रा येथून इतर पाच जणांनादेखील ताब्यात घेतले.


----------------
अटक करण्यात आलेली टोळी लहान मुले पळवून त्यांची विक्री करून लाखो रुपये मिळवत असल्याचे आढळून आले आहे. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने अशाच पद्धतीने लहान बाळांची बेकायदा खरेदी-विक्री केली असण्याची शक्यता आहे. त्यानुसार पुढील तपास करण्यात येत आहे.
- अतुल आहेर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com