स्वच्छता रॅलीतून नागरिकांमध्ये जनजागृती
भाईंदर, ता. २० (बातमीदार) : मिरा भाईंदर महापालिकेतर्फे इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी मिरा भाईंदर शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर करण्यामध्ये सर्वांचा सहभाग मोलाचा राहणार आहे, असे मत आयुक्त संजय काटकर यांनी या वेळी व्यक्त केले.
भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक, मिरा रोड रेल्वे स्थानक, अभिनव महाविद्यालय मैदान, काशीमिरा, सावित्रीबाई फुले मैदान या ठिकाणाहून स्वच्छता रॅली काढण्यात आली. तसेच शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छता तसेच प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर महिलांची फॅन्सी सायकल रॅली, किल्ल्यांची सफाई, समुद्रकिनाऱ्याची सफाई, बाईक रॅली, ऑटो रिक्षा रॅली व पेट शोचे आयोजन या वेळी करण्यात आले होते. आयुक्त संजय काटकर, इंडियन स्वच्छता लीगच्या ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेत्री दीपिका सिंह, आमदार गीता जैन, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, शहर अभियंता दीपक खांबित आदी उपस्थित होते.