मोदींसाठी खारघर चकाचक

मोदींसाठी खारघर चकाचक

खारघर, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबई मेट्रो सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणार आहे. यासाठी पनवेल महापालिकेकडून खारघर परिसरातील स्वच्छता आणि रस्ते डांबरीकरणाचे काम जोरात सुरू आहे.
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर खारघरमधील रस्त्यावर पडलेले खड्डे पालिकेकडून बुजवले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्य सरकारच्या नमो महिला सशक्तीकरण अभियान आणि नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी खारघरमध्ये येणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली आदी भागांतून महिला बचत गटाचे सदस्य आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेल पालिकेकडून खारघरचे प्रवेशद्वार असलेल्या हिरानंदानी आणि खारघर, कोपरा आदी रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हाती घेतले. हे काम जोरात सुरू आहे. शहरातील दुभाजक, चौक, रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्तीची कामे केली जात आहेत. रस्ते, पदपथ साफसफाईसाठी पालिकेचे ३५० कामगार चार दिवसांपासून काम करत आहे.

सुशोभीकरणाची लगबग
खारघरमध्ये प्रवेश करताच येणाऱ्या नागरिकांना आपलेसे वाटावे, यासाठी पदपथ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ग्रीलची रंगरंगोटी केली जात आहे. विशेष म्हणजे सेक्टर २२ ते २५ आणि सेक्टर ३९ हा परिसर सिडकोच्या ताब्यात असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार लावून परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. केंद्र आणि राज्याचे मंत्री महोदय कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्यामुळे हेलिपॅड बनवण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.

नागरिकांमध्ये समाधान
तळोजा वसाहतीची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. वर्षभरापासून नवी मुंबई मेट्रो सुरू होणार या आशेवर तळोजा आणि खारघरवासी होते. मात्र मोदींच्या हस्ते मेट्रोला हिरवा कंदील मिळणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे.

नवी मुंबई मेट्रो सुरू झाल्यास खारघर सेक्टर १२ ते ४० आणि तळोजा परिसरातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
- विनोद घरत, युवा नेता, भाजप

गणेशोत्सवात पालिकेकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले होते. पावसामुळे डांबरीकरण करता येत नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे खारघरमधील रस्ते दुरुस्ती आणि डांबरीकरणाचे काम सुरू आहे.
- जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com