मुंबईत आता राजकीय दांडिया

मुंबईत आता राजकीय दांडिया

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः मुंबईत आता नवरात्र आणि आणि दांडिया उत्सवाला राजकीय रंग आला आहे. मुंबईतील अधिकाधिक नवरात्रोत्सव मंडळे आपल्याकडे खेचण्याकडे राजकीय पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. पक्षांचे बॅनर आणि होर्डिंग मुंबईत ठिकठिकाणी झळकत आहेत. दांडियात रंगणाऱ्या तरुणाईला प्रभावित करण्याचा या पक्षांचा प्रयत्न सुरू आहे. यात भाजप, शिंदे गट, शिवसेनेसह सर्वच पक्ष आघाडीवर आहेत.
लालबाग, परळ, माझगाव, शिवडी, वरळी, दादर, भायखळा या भागात नवरात्र उत्सवाचे आकर्षण असते. सध्या या भागात राजकीय चढाओढ सुरू आहे. भाजप आणि शिंदे गटाने नवरात्र उत्सव मंडळांना मदत देण्यावर भर दिल्याचे समजते. आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात जोरदार राजकीय लढाई सुरू आहे. मुंबईतील दादर, परळसारख्या मराठीबहुल भागात शिवसेनेचा दबदबा दिसत आहे. जवळपास शंभर जागांवर मराठी मते निर्णायक आहेत. त्यात कोकणी मतांची टक्केवारी महत्त्वाची आहे. ही मते शिवसेनेची ताकद राहिली आहे. यावरच आता भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईत शिवसेनेचा उदय झाला तेव्हापासून सण-उत्सवांचा संबंध सेनेशी जोडला आहे. अनेक मंडळे, सोसायट्या, तिथले गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव, गरबा यामध्ये पहिल्यापासून सेनेचे वर्चस्व राहिले आहे. येथील शिवसेना ठाकरे गटाच्या वर्चस्वाला आता भाजप आणि शिंदे गट आव्हान देत आहे.
यंदा बोरिवलीतील कच्छी ग्राऊंड येथे भाजप आमदार सुनील राणे यांच्या पुढाकाराने, अंधेरीत भाजप नेते मुरजी पटेल यांच्या यांच्या पुढाकाराने, तर मुलुंड येथे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या पुढाकाराने दांडिया महोत्सवाचे आयोजन केले आहे. मिरा रोड येथे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने उत्सव होत आहे.

...
तीनशेहून अधिक भाजपकडून आयोजन
भाजपने जवळपास तीनशेहून अधिक ठिकाणी दांडिया कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासाठी विशेष पासची व्यवस्था करण्यात आल्याचे समजते. गेल्या वर्षीही तीनशे ठिकाणी गरबा उत्सवाचे भाजपने आयोजन केले होते. त्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
...
काही महत्त्वाची ठिकाणे
द एकर्स क्लब (क्रिस्टल हॉल), चेंबूर; पोलिस परेड ग्राऊंड, घाटकोपर (पूर्व); गोरेगाव क्रीडा संकुल, गोरेगाव (पश्चिम); कोरा केंद्र मैदान, बोरिवली (पश्चिम); पुष्पांजली गार्डन ग्राऊंड, बोरिवली (पश्चिम); बोरिवलीतील चिकूवाडी; दिवंगत प्रमोद महाजन मैदान, दादर; कच्छी ग्राऊंड, बोरिवली; नेस्को ग्राऊंड, गोरेगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com