शाळांतील महावाचन अभियानाचा बट्ट्याबोळ

शाळांतील महावाचन अभियानाचा बट्ट्याबोळ

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : राज्यातील शाळांमध्ये वाचन संस्कृती वाढावी, यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एक तासाच्या ‘महावाचन’ अभियानाची घो।णा केली होती; परंतु घोषणा केलेल्या अभियानाची अंमलबजावणीच होऊ शकली नसल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे अत्यंत चांगल्या अभियानाचा शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप होत आहे. अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी स्तरावरच चालढकलपणा झाल्याने यासाठी आर्थिक तरतूदही होऊ शकली नसल्याची माहिती समोर आली आहे.

शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी जुलैच्या अखेरीस शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीची चळवळ रूजावी, यासाठी राज्यात ‘महावाचन’ अभियानाची घोषणा केली होती. ही चळवळ ‘रीड इंडिया’च्या पार्श्वभूमीवर ‘रीड महाराष्ट्र’ नावाने ओळखली जाईल, असे उद्दिष्टही ठेवण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके, अवांतर साहित्यही वाचता यावे आणि त्यातून त्यांची आकलन आणि वाचन क्षमताही लक्षात यावी, असेही नियोजन करण्याचे केसरकर यांनी सूच‍ित केले होते.

अभियानाची अंमलबजावणी ५ सप्टेंबरपासून केली जाणार होती आणि १५ ऑक्टोबरला ‘वाचन प्रेरणा दिना’च्या दिवशी राज्यभरातील विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना बक्षिसे देण्याचे नियोजन होते; मात्र राज्यात ‘महावाचन’ अभियान राबवले गेले नसल्याने वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी हा विषय चर्चेत येण्याची शक्यता आहे.

पुस्तके पोहोचलीच नाहीत
महावाचन अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये प्रेरणादायी पुस्तके पोहोचवली जाणार होती. त्याची जबाबदारी समग्र शिक्षा अभियानाकडे सोपवली होती; मात्र यादरम्यान शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने या पुस्तकांसाठी आवश्यक निधी आणि तरतुदीसाठी ‘जीआर’ काढणे आणि इतर बाबी रखडल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्रात ‘महावाचन’ अभियान राबविण्याचे राहिले; परंतु मुंबईत ‘रिड मुंबई’ अभियान चांगल्या प्रकारे राबवले जात आहे. वाचन संस्कृतीसाठी आम्ही अनेक उपक्रम राबवत आहोत. शाळांमधील ‘एक तास वाचन’ या महावाचन अभियानाला अधिक विस्तृत आकार देऊन ते नव्याने राबवले जाईल.
- दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री

सरकारी शाळा उद्योगपतींना दत्तक देण्यासोबतच कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्याच्या नादात असलेल्या शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या हिताचा विसर पडत आहे. मंत्र्यांनी घोषणा केली तरीही राज्यात वाचन संस्कृतीला बळ मिळणाऱ्या अभियानाची अंमलबजावणी होऊ शकली नाही, ही मोठी खेदाची बाब आहे.
- शिवनाथ दराडे, कार्यवाह, शिक्षक परिषद, मुंबई

काय होते अभियान?
- प्रत्येक शाळेमध्ये आठवड्यातून एक तास विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी राखून ठेवला होता.
- विद्यार्थ्यांना वाचता यावे, त्याची आकलन आणि वाचन क्षमताही लक्षात यावी, हा उद्देश होता.
- वाचन संस्कृतीची एक मोठी चळवळ करण्याचे नियोजन या अभियानातून साकारले जाणार होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com