sachin ahir
sachin ahir

कामगार कायदे बदलण्याचा सरकारचा डाव हाणून पाडू,आमदार सचिन आहिर यांची कामगार मेळाव्यात ग्वाही

शिवडी, ता. २४ (बातमीदार) ः जे कायदे कामगार संघटनांनी संघर्ष आणि लढ्यातून मिळविले, ते बदलण्याचा सरकारने प्रयत्न केला, तर कामगार संघटना तो डाव हाणून पाडतील, अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन आहिर यांनी गिरणी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना दिली.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा ७६ वा वर्धापनदिन आणि दसरा संमेलन सोमवारी (ता. २३) महात्मा गांधी सभागृहात मोठ्या थाटामाटात पार पडला. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने दसऱ्याच्या पूर्व संध्येला कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. केवळ दुचाकी वरून होमिओपॅथी औषधोपचाराद्वारे गिरणी कामगारांची सेवा करणारे आंबेकर यांनी मुंबईत एक बलाढ्य कामगार संघटना उभी केली.

गं. द. आंबेकरजींच्या कामगार चळवळीतील या निःस्पृह कार्याला उजाळा देऊन सचिन अहिर म्हणाले, माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या अथक प्रयत्नातून तत्कालीन सरकारने केलेला माथाडी कायदा विद्यमान राज्य सरकार बदलत आहे. त्या शिवाय अनेक कायदे बदलण्याच्या धोरणाचा अहिर यांनी निषेध केला; तर गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर अहिर म्हणाले, शेवटच्या कामगाराला घर मिळेपर्यंत आम्ही लढत राहू. पात्रतेचे काम लवकरच संपवून म्हाडाने कामगारांना घरे उपलब्ध करून द्यावीत. या प्रश्नावर आम्ही लढा उभा केल्यामुळे असंख्य घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही अहिर म्हणाले;

तर आंबेकर यांच्या नावाने देण्यात येणारे पुरस्कार त्यांच्या स्मृतिदिनी (ता. १३ डिसेंबर) देण्यात येतील, त्यासाठी प्रस्ताव येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत स्वीकारण्यात येतील, अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली. कार्यक्रमात‌‌ शाहीर रूपचंद चव्हाण यांनी बहारदार शाहिरी कार्यक्रम सादर केला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर होते. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. आंबेकर श्रमसंशोधन‌ संस्थेचे सल्लागार डॉ. शरद‌ सावंत, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सचिव शिवाजी काळे, राजन लाड, संजय कदम, उत्तम गिते, मिलिंद तांबडे आदी पदाधिकारी त्या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com