Dasara-Purchasing
Dasara-Purchasing

Dasara: वाहन कंपन्यांना अच्छे दिन, घरांची बुकिंग जोरात; दसऱ्याला खरेदीचा उच्चांक

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.२४ : साडेतीन महिर्तांपैकी एक विशेष मुहूर्त असणाऱ्या दसऱ्याला नवी मुंबई, पनवेल आणि उरण परीसरातील बाजारपेठांमध्ये जोरदार खरेदी झाली. यावेळी अनेकांनी सोने खरेदीला अधिक महत्त्व दिल्याने सराफा बाजारात कोट्यवधीची उलाढाल झाली होती. तर नवीन पनवेल, खारघर, नेरुळ परिसरात नवीन वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने बाजारपेठांमध्येही खरेदीची उत्साह दिसून आला.

आश्विन महिन्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणून दसरा सणाचे महत्त्व आहे. या दिवशी धन, ज्ञान आणि शस्त्रांची पूजा करण्यात येते. देवीची आराधना केली जाते. तसेच आजच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जाते. सकाळपासूनच नागरीकांनी बाजारांमध्ये गर्दी केलेली दिसून आली. पनवेलमधील सराफा बाजार म्हणून ओळख असलेल्या झवेरी परिसरातील नामांकित पेढ्यांवर दागिणे खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते एमटीएनएल पर्यंतच्या रस्त्यावरही नामांकित कंपन्यांच्या सोन्याच्या पेढ्यांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती.

यानिमित्ताने सोन्याच्या पेढ्यांनीही जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी घडणावळीवर ५० टक्क्यांपेक्षा जास्त सवलती दिल्या आहेत. सोन्याचे दागिणे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिलांकरीता ठूशी, अलिकडच्या काळात मालिकांमधील सिनेतारकांच्या गळ्यातील वैविध्यता असणारे मंगळसूत्र, कानातील झूमके, सोनसाखळ्या, बांगड्या, पाटल्या, लक्ष्मीहार यांना महिलावर्गाकडून मागणी होती. पनवेल परिसरातील सोन्याच्या पेढ्यांवर आज एका दिवसात दागिन्यांच्या खरेदीने कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.

वाहन कंपन्यांना अच्छे दिन
अलीकडच्या काळात भारतात पाय रोवू पाहणाऱ्या परदेशातील कंपन्यांनी लक्झरी प्रकारातील चारचाकी वाहने विक्रीसाठी आणली आहेत. तर दुचाकी कंपन्यांनीही स्पोर्टी लुक असणारे नवीन दुचाकी विक्रीसाठी आल्या आहेत. त्याला ग्राहकांना चांगला प्रतिसाद मिळाला असून दसऱ्याच्या मुहुर्तावर अनेकांनी आपल्या स्वप्नातील गाडी खरेदी करण्याची संधी साधली आहे.


दक्षिण नवी मुंबईत घरांची बुकिंग जोरात
नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, वाशी, सानपाडा-जूईनगर आणि सीवूड्स परिसरात महागड्या घरांच्या प्रकल्पांमध्येही अनेक उच्च उत्पन्न गटातील लोकांनी घर खरेदी केली. उलवे, बामनडोंगरी, द्रोणागिरी, पूष्पकनगर, खारघर, तळोजा येथे निर्माण केलेल्या घरांच्या विक्रीलाही जोरदार प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षभरात या परिसरात सुमारे दीड लाख घरे तयार आहेत. त्यापैकी ५० टक्के घरांची बुकिंग केल्याचे विकासकांनी सांगितले. तर जवळपास ५० टक्के ग्राहकांनी आजच्या दिवशी तयार घरांमध्ये ताबा घेत गृहप्रवेश केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com