६५० किलोमीटरचे रस्ते धुणार

६५० किलोमीटरचे रस्ते धुणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : हवेतील वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना म्हणून मुंबईतील ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करून ते पाण्याने धुवून काढण्याची कामे पालिका वेगाने करणार आहे. त्यासाठी १२१ टँकर व इतर संयंत्रे तैनात केली आहेत. पालिकेच्या २४ प्रभागात रस्ते धुण्याचे काम सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

हवेतील प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने महापालिकेने उपाययोजनांना गती दिली आहे. स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा यामध्ये वापर केल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
वायू प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांना वेग देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आज पालिका मुख्यालयात बैठक घेतली. उपायुक्‍त चंदा जाधव, उपायुक्‍त उल्‍हास महाले यांच्यासह परिमंडळांचे उपआयुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख, घनकचरा विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

मुंबईतील वायू प्रदूषण आणि धूळ नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने सक्रिय पावले उचलावीत, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये युद्ध पातळीवर ही कामे सुरू आहेत. शहरातील रस्ते व पदपथांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळ प्रतिबंधक यंत्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. संपूर्ण मुंबई महानगरात मिळून सुमारे ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमित स्वच्छ करून धुवून काढण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी पाण्याचे १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत.

जलस्रोतांचा वापर
पाणी टँकरची संख्या, प्रत्येक टँकर फेऱ्यांची वारंवारता आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुरवठ्याचा सर्वात जवळचा स्रोत यांचा समावेश तपशीलवार आराखड्यात करण्यात येत आहे. पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा त्याचप्रमाणे विभागातील पाण्याचे स्थानिक स्रोतांमधील (तलाव, विहीर, कूपनलिका) पाण्याचा वापर करून रस्ते व पदपथ धुतल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही, याचीही काळजी घेतली जात असल्याचे उपआयुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) चंदा जाधव यांनी सांगितले.

रस्ते धुण्याच्या वेळा
१) वर्दळीच्या ठिकाणी पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान रस्‍ते धुण्‍याची कार्यवाही करण्यात येत आहे. काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या सत्रात ही कार्यवाही केली जात आहे.
२) रस्ते व पदपथ धुण्याचे काम ३ ते ४ तासांत पूर्ण करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. त्यासाठी स्वच्छता करणाऱ्या वाहनांची संख्‍या वाढविण्‍यात येत आहे.
३) मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, मेट्रो, म्हाडा आणि इतर संबंधित संस्थांसमवेत समन्‍वय साधला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com