खासदार श्रीकांत शिंदे
खासदार श्रीकांत शिंदे esakal

Ambarnath: फिटेना अंधाराचे जाळे,खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतला अंबरनाथमधील पथदिव्यांचा आढावा

अंबरनाथ, ता. २१ (बातमीदार) : अंबरनाथला सगळे मुख्य रस्ते सिमेंटचे झाले आहे; मात्र रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कचरा, पाणी आणि पथदिव्यांवरून नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील पथदिवे त्वरित दुरुस्त करावेत, असे आदेश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले.

शहरातील बांधकाम सुरू असलेले नाट्यगृह, नेहरू उद्यान, रात्र निवारा केंद्र आदी विविध विकास कामांचा पाहणी दौरा करून खासदार डॉ. शिंदे यांनी आढावा घेतला. शहरातील कचरा, बंद पथदिवे, पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत नागरिक तसेच लोकप्रतिनिधींच्या तक्रारी वाढल्या आहेत. या समस्या त्वरित दूर करण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना खासदार शिंदे यांनी केल्या.

अंबरनाथ नगरपालिकेत कचरा उचलणे तसेच विद्युत पथदिव्यांचे काम ठेकेदारामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. काही तांत्रिक बाबींमुळे दोन्ही कामे योग्य रीतीने होत नाही. तसेच प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात तोडगा निघत नसल्याने त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो. शहरातील असंख्य पथदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहे. रस्त्याच्या मध्यभागी पथदिवे बसवण्यात आले आहेत. रस्ते चांगले आहेत; मात्र त्यावर अंधार असेल, तर उपयोग काय, असा सवाल खासदार शिंदे यांनी उपस्थित केला.

पूर्ण शहरातील पथदिव्यांचा आराखडा तयार करून स्वच्छ प्रकाश देणारे दिवे लावावेत, चौकाचौकात गरजेनुसार हायमास्ट लावण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. डिसेंबरअखेर पथदिव्यांच्या कामात सुसूत्रता आणली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरचा घनकचरा प्रकल्प तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर कार्यान्वित होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, मनीषा वाळेकर, प्रज्ञा बनसोडे, सुनील चौधरी, अरविंद वाळेकर, वामन म्हात्रे, मुख्यमंत्र्यांचे सचिव बालाजी खतगावकर, सुभाष साळुंके, रवी पाटील, पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी अभिजित पराडकर, विविध खात्याचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन
नाट्यगृह, सॅटिस प्रकल्प, प्रशासकीय इमारतीचे वाढीव बांधकाम यांसारख्या कामांसाठी निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे अंदाजे १०० कोटी निधीच्या मागणीचा प्रस्ताव पालिका प्रशासनातर्फे मांडण्यात आला. अंबरनाथ आणि बदलापूरची पाणी समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करून पाणी समस्येवर तोडगा काढला जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.


अंबरनाथ शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे काम सुरू आहे. यातील बहुतांश वास्तूंचे काम पूर्ण झाले असून नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. याचबरोबर प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प, संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचे कामही प्रत्यक्षात सुरू करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. या सर्व विकास प्रकल्पांमुळे अंबरनाथ शहराचा विकास सुरू आहे.
- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com