सुखकर प्रवासाचे स्वप्नभंग

सुखकर प्रवासाचे स्वप्नभंग
Published on

खारघर, ता.२८ (बातमीदार)ः नवी मुंबई मेट्रोमुळे खारघर आणि तळोजा परिसरात धावणाऱ्या एनएमएमटी तसेच तळोजा येथील शीघ्र कृतिदल ते खारघर रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या खासगी प्रवासी वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, नवी मुंबई मेट्रोच्या तिकिटांच्या दरामुळे फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसत असून बहुतांश प्रवाशांची एनएमएमटीलाच अधिक पसंती असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सुखकर प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या नवी मुंबईकरांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसत आहे.
नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सिडकोने बेलापूर ते पेंधर या अकरा किलोमीटर लांबीच्या मार्गावर नवी मुंबई मेट्रो सुरु केली आहे. या सुविधेमुळे तळोजा आणि खारघरमधील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. कारण तळोजा वसाहतीमधून खारघर रेल्वे स्थानक गाठण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटी किंवा खासगी प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत असल्याने वेळेचा तसेच पैशांचाही अपव्यय होत होता. त्यामुळे मेट्रो सुरू झाल्यानंतर तळोज्यातील रहिवाशांची अधिक पसंती मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. तसेच या सुविधेमुळे एनएमएमटीच्या वाहतुकीवर परिणाम होईल, असे वाटत होते. मात्र, सध्या मेट्रोचे असलेले तिकिटांचे दर पाहता त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे. आजही खारघर रेल्वे स्थानकात येण्यासाठी एनएमएमटीला अधिक पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.
-----------------------------
खासगी वाहतुकीला फटका
सायंकाळी खारघरवरून तळोजा येथे जाण्यासाठी रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काही प्रवासी लवकर घर गाठण्यासाठी मेट्रोने प्रवास करत असल्याचे दिसून येते. मात्र, मेट्रोचे तिकीट दरात कमी झाल्यास एनएमएमटी वाहतुकीवर परिणाम होवू शकतो. तळोजा येथील शीघ्र कृती दल ते खारघर रेल्वे स्थानक दरम्यान जवळपास शंभराहून अधिक प्रवासी वाहने धावतात. ज्या प्रवाशांना लवकर स्थानक गाठून पुढील प्रवास करावयाचे आहे. असे प्रवासी एनएमएमटीच्या एेवजी खासगी वाहनाने खारघर रेल्वे स्थानक गाठत होते. मात्र, मेट्रोमुळे आता या खासगी वाहनांच्या व्यवसायावर दहा टक्के परिणाम झाला आहे.
ः--------------------------------
नवी मुंबई मेट्रोमुळे एनएमएमटीच्या प्रवासी वाहतुकीवर काही परिणाम झाला नाही. पूर्वीप्रमाणे प्रावसाचा प्रतिसाद आहे.
- योगेश कडूस्कर, व्यवस्थापक परिवहन विभाग, नवी मुंबई महापालिका
--------------------------
मेट्रोचे तिकीट जास्त आहे. सर्व सामान्य व्यक्तीला परवडणारे नाही. बसमध्ये गर्दी असते. मात्र, तिकीट दर कमी असल्यामुळे सोयीचे आहे.
- अमर सावंत, रहिवासी, तळोजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com