

ठाणे, ता. २८ (बातमीदार) : कोळी नाही कोणाच्या धमकीस भिणारा या गाण्याला सार्थ ठरवताना अवकाळी पावसाला न जुमानता पारंपरिक वेशभूषा, पायांना आपसूक ठेका धरायला लावणारे लोकसंगीत आणि कोळी पद्धतीने बनवलेल्या जेवणाची साथ यामुळे चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित कोळी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. त्यात पावसातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
रविवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सकाळी आयोजक चिंतेत पडले होते, पण त्याही परिस्थितीत कोळी महोत्सव यशस्वी करायचाच यादृष्टीने तयारी सुरू ठेवली. दुपारी पाऊस कमी झाल्यावर आई एकवीरेला गाण्यात साकडे घालत कार्यक्रमाला सुरुवात केली आणि पावसाला न जुमानता कार्यक्रम पूर्णत्वास नेला. पावसातही कोळी गाण्यांवर उपस्थित प्रेक्षकांनी धरलेला ताल, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांची गर्दी उसळली होती.
चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेली शोभयात्रा भरपावसात चेंदणी बंदरावर दाखल झाल्यावर हरेश्वर-भारती मोरेकर, तुकाराम-प्रमिला कोळी, विलास-दुर्गा कोळी या दाम्पत्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कोळी महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्थानिक गायक आणि लहान-मोठ्या कलाकारांनी आपल्या नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कोळी महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावली. कोळी समाज मुळातच धाडसी असल्याने अस्मानी संकटाला मात देत कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजक विक्रांत कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शिंदे यांनी अभिनंदन केले. माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक भरत चव्हाण, नम्रता कोळी, काँग्रेसचे सचिन शिंदे आणि इतर मान्यवरांनी या वेळी उपस्थिती लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.