

रुग्णांना मिळणार टेट्रा दूध
पालिकेचा विचार सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : पालिकेच्या रुग्णालयात टेट्रा पॅक दूध देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर विचारविनिमय सुरू असून यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी ‘आरे डेअरी’शी पालिकेचा करार झाला होता; मात्र काही कारणास्तव त्यांनी पुरवठा बंद केला.
पालिकेने वर्षभरानंतर सर्व रुग्णांना सुटे दूध देण्याऐवजी टेट्रा पॅक दूध रुग्णांना देण्याचा विचार केला आहे. दरम्यान, २९ ऑगस्टला आरे डेअरीने पालिकेला पत्र लिहून कळवले, की ते दूधपुरवठा करण्यास सक्षम नाहीत. त्यानंतर रुग्णालयांनी स्थानिक पातळीवर बालरुग्ण, गरोदर स्त्रिया आणि नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब तसेच ज्यांना दुधाची गरज आहे, अशा रुग्णांसाठी दूध खरेदी केले आहे.
अपव्यय कमी
सुरुवातीला पालिकेने नुसतीच दुधाची पॅकेट खरेदी करण्याचा विचार केला. टेट्रा दूध पॅकचा निर्णय घेण्यासाठी आम्हाला जवळपास चार महिने लागले. टेट्रा पॅकिंग असलेले दूध संग्रहित करणे सोपे आहे आणि दिवसाच्या गरजेनुसार वापरता येऊ शकते. दुधाची पाकिटे विकत घेतल्यास सकाळी उकळून त्याच दिवशी संपवावी लागतात. टेट्रा पॅक संभाव्य अपव्यय कमी करण्यास मदत करू शकतात, असे केंद्रीय खरेदी विभागाचे सहआयुक्त विजय बालमवार यांनी सांगितले.
खर्च वाढला
सर्व पालिका रुग्णालयांसाठी दूध खरेदीच्या निविदांवर लक्ष ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. टेट्रा पॅकमध्ये बदल करण्यासाठी पालिकेने आपला खर्च १४ कोटींवरून ४२ कोटींपर्यंत नेला आहे. आता १०० मिली आणि २०० मिलीचे टेट्रा पॅक खरेदीमध्ये समाविष्ट केले जातील.
चार हजार लिटर दुधाची गरज
केईएम, सायन, डॉ. आरएन कूपर आणि बीवायएल नायर यांच्यासह शहरातील प्रमुख रुग्णालये, १६ परिधीय रुग्णालये आणि ३० प्रसूतीगृहांना दररोज सरासरी ४ हजार लिटर दुधाची गरज भासते. एकट्या चार प्रमुख रुग्णालयांना दररोज ७०० लिटर दूध लागते आणि आरे डेअरी याआधी हे दूध ३९ रुपये प्रतिलिटर या अनुदानित दराने पुरवत होती.
यापूर्वी रुग्णालये आपापल्या स्तरावर मागणी पुरवत होते. आता पहिल्यांदाच अशा प्रकारे केंद्रीय पद्धतीने संपूर्ण मुंबईसाठी दूध खरेदी करणार आहोत. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करणार आहोत. आम्ही टेट्रा मिल्क पॅक देण्याचे ठरवले आहे. कारण ते अधिक सोयीचे आहे आणि आम्हाला रुग्णांना सुटे दूध देण्याची गरज नाही. आम्ही १०० मिली, २०० मिली, ५०० मिली आणि १ लिटरची टेट्रा पॅकेट खरेदी करणार आहोत. ज्यापैकी १०० मिली दूध रुग्णांना दिले जाऊ शकते.
- विजय बालमवार, सहआयुक्त, केंद्रीय खरेदी विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.