गुळाचा आहार थंडीत लयभारी

गुळाचा आहार थंडीत लयभारी

नेरूळ, बातमीदार
ऋतुमानानुसार आहार हे भारतीय खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. सणासुदीच्या निमित्ताने आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश केलेला आढळतो. आता थंडीच्या दिवसात आवर्जून गुळाच्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे प्रत्येकाच्या घरात गूळ असतो. रात्री जेवल्यानंतर गूळ खावा, असे म्हटले जाते. कारण तो पचनासाठी फायदेशीर असतो. गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. जे शरीरातील लोहाची कमतरता भरून काढते. कोणत्याही मार्गाने गूळ शरीरात जावा, यासाठी आपण प्रयत्नशील असतो. गुळापासून अनेक गोड पदार्थ तयार केले जातात. गूळ खाण्याचे अनेक फायदे आजीकडून ऐकले असतील. गूळ खाण्‍यासाठी चविष्ट तर आहेच; पण आरोग्याच्या दृष्टीनेही एक खजिना आहे.
-------------------------------------
सर्दी-पडशावर सर्वाधिक गुणकारी
- हिवाळ्यात गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. गुळाच्या तापमानवाढीच्या प्रभावामुळे सर्दी, खोकला आणि कफापासून आराम मिळतो. गुळाचा उकड करून प्यायल्यास घशाला आराम मिळण्यास मदत होते. गूळ गरम करून कोमट पाणी प्यायल्यास घसादुखी आणि जळजळीपासून आराम मिळतो. यामुळे आवाजही चांगला येतो.
- सर्दी-पडसे दूर करण्यासाठीही गूळ लाभदायी ठरतो. काळीमिरी, आले आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी-पडसे कमी होते. खोकला येत असेल, तर साखरेऐवजी गूळ खाणे लाभकारक ठरते. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते. आल्यासोबत रोज गुळाचा एक तुकडा खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.
-----------------------------------------
नियमित सेवनाने स्मरणशक्तीला लाभ
- रक्तातील हानिकारक घटक काढून टाकण्याचे काम गूळ करतो. तसेच त्वचा स्वच्छ करण्यासाठीही त्याची मदत होते. यामुळे रक्त परिसंचरणही सुधारते. रोज थोडासा गूळ खाल्ल्याने पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते आणि त्वचेवर चमकही येते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीही गूळ उपयुक्त आहे. गुळामध्ये अँटी-अॅलर्जीक घटक असतात. त्यामुळे दम्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
- मोहरीच्या तेलात मिसळून खाल्ल्यास श्‍वसनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. एखाद्याचा आवाज कर्कश असेल, तर अशा वेळी शिजवलेल्या भातात गूळ मिसळून खाल्ल्याने कर्कशपणा दूर होण्याची शक्यता असते. काही लोकांना सातत्याने थकवा जाणवत असेल किंवा अशक्तपणा आल्यासारखे वाटत असेल, तर त्यांनी रोज थोडा गूळ खावा.
- गूळ पाचक असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे साखर वाढत नाही. मात्र, एनर्जीची पातळी चांगली ठेवण्यासही मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या समस्यांमध्ये आराम देण्यासाठीही गूळ खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढते.
--------------------------------------
जास्त प्रमाणात सेवन घातक
- साखरेपेक्षा गूळ शरीरासाठी पौष्टिक असला, तरी तो जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची समस्या वाढू शकते.
- गूळ पूर्णपणे शुद्ध नसतो. त्यामध्ये सुक्रोजचे प्रमाणात अधिक असते.
- गुळाचा प्रभाव गरम असतो. त्यामुळे जर कोणी गूळ किंवा त्यापासून तयार पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करत असेल तर त्याला नाकातून रक्त येणे, लूज मोशन इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com