कुकशेतचे गावपण हरवले

कुकशेतचे गावपण हरवले

शुभांगी पाटील, तुर्भे
रासायनिक प्रदूषणाचा उवाहापोह करून विस्थापित नवी मुंबई शहरातील आगरी समाजाचे वास्तव असलेले कुकशेत गाव विस्थापित झाले होते. बऱ्याच वर्षाचा काळ लोटला तरी या गावातील ग्रामस्थांच्या मनात आजही अनेक आठवणी घर करून आहेत. आजच्या घडीला या ठिकाणी गाव नसले तरी मोडकळीस आलेल्या घरांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, गावात असणाऱ्या मरिआई, विठ्ठल रखुमाई मंदिरासह जागृत कालभैरव मंदिराचे रिकामे गाभाऱ्यांकडे बघितल्यानंतर कुकशेतच गावपण हरवल्याची बाब प्रकर्षाने जाणवते.
-------------------------------------------
सायन -पनवेल महामार्गावरील हार्डिलिया या पहिल्या रासायनिक कारखान्याच्या मागे असलेले विस्थापित गाव म्हणजेच कुकशेत. या गावातील कौलारू छत, सारवलेल्या भिंतीं, घरासमोरील विस्तीर्ण अंगण तसेच घरांच्या मागच्या बाजूला पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांमुळे हिरवेगार असलेल्या कुकशेत गाव २८ वर्षांपूर्वी नेरुळ सेक्टर १४ येथे विस्थाापित करण्यात आले. तेव्हापासून या गावाला नवीन कुकशेत म्हणून ओळखले जाते. आज भलेही सिमेंटच्या पक्क्या घरांमध्ये ग्रामस्थांचे वास्तव्य आहे. पण गावाचे गावपण हरवून गेल्याची खंत आजही व्यक्त केली जाते. महत्त्वाचे म्हणजे, जुन्या कुकशेतच्या बाजूला बोनसरी हे मोजक्याच घरांचे गाव होते. साधारण शंभर वर्षांपूर्वी गावावर प्लेगचे संकट आल्याने कुकशेत गावातच या गावाला विस्थापित व्हावे लागले, याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. शहरीकरणाच्या ओघात येण्यापूर्वी गावाच्या पूर्वेकडील भागात आदिवासी पाडे, डोंगर आणि शेती होती. तर पश्चिमेस ठाणे-बेलापूर व सायन-पनवेल महामार्ग आहे. तर दक्षिण बाजूस टेकडीवरचे शिरवणे गावाच्या भौगोलिक रचनेमुळे कुकशेत, बोनसरी गावाच्या जुन्या आठवणी विस्थापिताच्या २८ वर्षांच्या कालावधीनंतर आजही ग्रामस्थांना आल्याशिवाय राहत नाही.
---------------------------------------------------
कारखाना विस्थापनासाठी लढा
- १९६७ साली पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याहस्ते हर्डिलिया कंपनीची स्थापना झाली. या कंपनीचे पूर्वी नाव लोमस होते. नव्या मुंबईतील पहिला रासायनिक कारखाना कुकशेत सुरू झाला. गावाची सुमारे साठ एकर जमीन या कारखान्यासाठी संपादित करण्यात आली. त्याच गावाला नंतर विस्थापित व्हावे लागले.
- या कारखान्यात १९८५ मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन एक कामगार मृत्युमुखी पडला होता. कारखाना व्यवस्थापनाने हे निमित्त साधून गाव हटवण्याची मागणी एमआयडीसीकडे केली. त्यानंतर कंपनी व्यवस्थापन व ग्रामस्थांमध्ये वादाची ठिणगी पडली. वाद न्यायालयात गेला. मात्र, तिथेही कंपनी व्यवस्थापनाच्या बाजूने निकाल लागल्याने ग्रामस्थांना घर सोडावे लागले.
--------------------------------------
ग्रामस्थांचे श्रद्धास्थान
जुन्या कुकशेत गावाच्या दक्षिण बाजूस गावदेवीचे मंदिर होते. तर उत्तरेला कालभैरवाचे स्थान असल्याचे मानले जात होते. गावाच्या मध्यभागी मरिआई देवीचे एक मंदिर होते. विठ्ठल-रुखमाई मंदिराचीनंतर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हर्डिलिया कंपनीने गावात अनेक सुविधा दिल्या. त्यात जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धारही आहे. काही मंदिर या नवीन ठिकाणी बांधण्यात आलेली आहेत.
----------------------------------------------
आमच्या मनात आजही गावाच्या आठवणी कायम आहेत. कंपनीकडून एक प्रकारे आमच्यावर अन्याय झाला. पण गावाचे गावपण हे जुन्या कुकशेतमध्येच अनुभवाला मिळाले.
- पुंडलिक पाटील, ग्रामस्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com