गुन्हागारांवर रायगड पोलिसांचा वचक

गुन्हागारांवर रायगड पोलिसांचा वचक

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ६: सरते वर्ष रायगड पोलिसांसाठी खूपच उलथापालथीचे गेले असले तरी गुन्हेगारांवर वचक आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात रायगड पोलिस यशस्वी झाले आहेत. गतवर्षी जिल्ह्यात दोन हजार ७१५ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी दोन हजार ३६६ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. म्हणजेच वर्षभरात दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांपैकी ८७ टक्के गुन्ह्यांची उकल झाली आहे. याशिवाय अमली पदार्थाच्या तस्‍करीचा भांडाफोड करण्यात यश मिळवले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुन्हे उकल होण्याचे प्रमाण वाढले असले तरी गुन्हांचे प्रमाण वाढल्‍याची नोंद आहे. महिला विषयक गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात रायगड पोलिस राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. गुन्हे शाबीत प्रमाण ६८.८७ टक्के असून राज्यात रायगड पोलिस दल पहिल्या पाचमध्ये आहे. रायगड पोलिस दलाच्या वार्षिक कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिली. अपर अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे या वेळी उपस्थित होते.
पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत २०२२ मध्ये दोन हजार ५८५ गुन्हे घडले होते. यापैकी दोन हजार २४९ गुन्हे उघडकीस आले असून सरासरी ८७ टक्के गुन्ह्याची उकल करण्यात यश आले होते. २०२३ मध्ये ४६६ अधिक गुन्ह्याची नोंद झाली आहे. गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले असले तरी मागील वर्षाच्या तुलनेत गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण मात्र जास्त आहे. २०२३ मध्ये ८७ टक्के गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलिस दल कोकण परिक्षेत्रात सर्वोत्तम आहे.


खुनाचे गुन्हे उकल करण्यात ९० टक्के यश
जिल्ह्यात २०२३ मध्ये ३६ खुनाचे गुन्हे नोंद केले गेले त्यापैकी ३५ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. मांडवा आणि रोहा येथील जुन्या खून प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नाही. कारण दोन्ही प्रकरणात ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे त्याची ओळख पटलेली नाही. खुनाचा प्रयत्न करण्याचे २९ गुन्हे घडले ते सगळे उघडकीस आले. मालमत्ताविषयक ६९४ गुन्हे वर्षभरात दाखल झाले यातील ४५४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. मारहाणीच्या सर्व ३८३ गुन्ह्यांची उकल करण्यात आल्‍याचे या वेळी पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

प्रतिबंधक कारवाई
रायगड पोलिस प्रशासनाने तीन गुन्हेगारी टोळ्यांना आणि सहा व्यक्तींना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. एका व्यक्‍तीस एक वर्षाकरिता स्थानबद्ध केले आहे. एक गुन्हेगारी टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. सात हजार ९३५ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अवैध धंद्यांवरही कारवाई
जिल्ह्यात अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रायगड पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये दारूबंदी ६१५, जुगार, मटका १९३, अमली पदार्थ १८, अवैध अग्‍निशस्‍त्रे १५ गुन्हे दाखल केले आहेत. २०२२ मध्ये २२० ठिकाणी मटका-जुगाराच्या ठिकाणी छापा टाकून एक कोटी ११ लाख ४३ हजार ३२३ रुपये तर ७२६ दारूबंदीची कारवाई करून ६७ लाख १६ हजार ५७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महिला विषयक गुन्ह्यात ९८.२८ टक्के उकल
रायगड जिल्ह्यात महिला अत्याचाराचे एकूण २३३ गुन्हे दाखल झाले होते. यापैकी २२९ गुन्हे उघडकीस आले आहेत. महिला विषयक दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचे ६० दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असून त्याचे प्रमाण १०० टक्के आहे.

गुन्ह्यांची उकल करण्यावर नेहमीच भर दिला जातो. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्याच बरोबर गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवरही भर दिला जात आहे.
- सोमनाथ घार्गे , पोलिस अधिक्षक, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com