आरोग्य व्यवस्थेला सलाईन

आरोग्य व्यवस्थेला सलाईन

वसई, ता. ६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम परिसरातील आरोग्य समस्या दूर करण्यासाठी आरोग्यमय सुविधा मिळाव्यात, तसेच कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी आरोग्य सुविधा केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा मिळणे फायदेशीर ठरणार आहे.

जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात. रुग्णांना सेवेसाठी अनेकदा लांबचा पल्ला गाठावा लागतो, मात्र रुग्णालयात जाण्यासाठी काही वेळी दुर्घटना घडतात. गरोदर महिला, दुर्धर आजाराने त्रस्त रुग्ण, अचानक उद्‍भवणारी समस्या व त्यासाठी त्वरित उपचार मिळावे, यासाठी धडपड करण्यात नागरिकांचा वेळ जातो. तसेच आरोग्य सुविधा संबंधित भागात पोहचवण्यासाठी देखील आरोग्य विभागाला द्राविडी प्राणायाम करावा लागतो. त्यामुळे त्याच भागात डॉक्टर, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थान, औषधांचा पुरेपूर साठा असावा, म्हणून भांडार विभाग, अतिरिक्त जिल्हा आरोग्य विभाग सेवा व उपकेंद्र आदींसाठी जिल्हा परिषदेने नव्याने इमारती उभारल्या आहेत. जेणेकरून ग्रामीण भागात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.

जव्हार, मोखाडा, तलासरी, पालघर, डहाणू, विक्रमगड या तालुक्यांत नागरिकांना अधिकाधिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपकेंद्र, आरोग्य केंद्र, अतिरिक्त जिल्हा आरोग्य केंद्र, औषध भांडार यासह अन्य सुविधांचे जाळे निर्माण केले गेले आहे. जिल्ह्यात १३ ठिकाणी आरोग्य संस्थांना बळकटी देण्यात आली आहे. आपल्या नजीकच आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध होणार असून हा आराखडा पालघर जिल्ह्याला आरोग्यमय वाटचालीकडे घेऊन जाणारा ठरणार आहे.

पालघर जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्था, कार्यालय उद्‍घाटन व भूमिपूजन मंगळवारी (ता. ९) सकाळी १० वाजता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आभासी पद्धतीने होणार आहे. या वेळी मंत्री तानाजी सावंत, कपिल पाटील यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.


पालघरमधील नवीन सुविधा :
- गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य इमारत व निवासस्थान.
- जव्हार येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय व औषध भांडार.
- चवनई चंद्रनगर येथे मुख्य इमारत व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान.

उपकेंद्रासाठी इमारती उभारणार
आयरे, तिलोंडा येथे उपकेंद्र, विक्रमगडमधील तलवाडा, थेरोंडा याठिकाणी उपकेंद्र इमारत, तसेच तलासरी, काजळी उपकेंद्र इमारत, बीपीएचयु इमारत, डोल्हारपाडा येथे उपकेंद्र इमारत, पालघर, मोखाडा आणि डहाणू येथे बीपीएचयु इमारत.

पाणजू येथे कर्मचाऱ्यांसाठी वसाहत
वसई, पाणजू येथे प्राथमिक आरोग्य पथकासाठी मुख्य इमारत व कर्मचारी वसाहतीचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी सुमारे पाच कोटी खर्च अपेक्षित आहे. भूमिपूजन केल्यावर प्रत्यक्ष इमारतीचे काम सुरू केले जाणार आहे.

पालघर जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात उत्तम आरोग्य सेवा मिळावी, म्हणून प्रयत्न केले जात आहेत. १३ ठिकाणी अतिरिक्त जिल्हा आरोग्य केंद्र, उपकेंद्र, औषध भांडार, निवासस्थान उभारण्यात आले आहेत. कुपोषण व आरोग्य समस्या दूर करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग पावले उचलत आहे.
- भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद

जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा
ठिकाण खर्च (लाखांत)
गंजाड ५६०,००
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय व औषध भांडार - ४०१. ७०
आयरे ५५.२८
तिलोंडा ५५.२८
थेरोंडा ५५.२८
काजळी ५५.५०
बीपीएचयु पालघर ५०
बीपीएचयु मोखाडा ५०
बीपीएचयु तलासरी ५०
बीपीएचयु डहाणू ५०
वनई, डहाणू ४९५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com