बनावट चेसिस, इंजिन क्रमांकाची वाहने रस्त्यावर

बनावट चेसिस, इंजिन क्रमांकाची वाहने रस्त्यावर

नालासोपारा, ता. ६ (बातमीदार) : बनावट चेसिस, इंजिन क्रमांक बनवून वाहनांची अरुणाचल प्रदेशमध्ये नोंदणी असल्याच्या ना हरकत प्रमाणपत्रावरून, राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांत नोंदणी करण्यात आली आहे. ही वाहने नव्याने रस्त्यावर आणून चालवणारी टोळी राज्यात सक्रिय आहे. अशा ६० वाहनांची नोंदणी विरारच्या आरटीओ कार्यालयात झाल्याचे उघड झाले. त्यातील तीन वाहनांचा शोध लागला असून विरार आरटीओने बस, टँकर; तर सोलापूर आरटीओने प्रत्येकी एक वाहन पकडले आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोणत्याही वाहनाची आरटीओकडे नोंदणी करायची असेल, तर वाहनांची मूळ ओळख चेसिस क्रमांकावरून ठरविली जाते. त्यावरून वाहनांची तपासणी होते. त्याचे आरसी बुक, चेसिस नंबर, परराज्यातील असेल, तर त्या राज्याचे ना हरकत प्रमाणपत्र बघून त्याची आरटीओ कार्यालयात नोंदणी करून त्या राज्याचा पासिंग नंबर त्या वाहनाला दिल्या जातो. २०१७-१८ या वर्षांपासून आजपर्यंत अनेक वाहने अरुणाचल प्रदेशातील नोंदणीवरून महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयात नोंदणी झाली आहेत. ही नोंदणी होताना हस्तांतरणासाठी जी आवश्यक कागदपत्रे लागतात, ती सर्व बनावट तयार करून त्या नोंदणी झाल्या आहेत.

विरारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांच्याकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर, त्यांनी कार्यालयात तपासणी केली असता ६० वाहनांच्या नोंदणी विरार आरटीओ कार्यालयात झाल्याचे निदर्शनास आले. अशा बनावट वाहनांचे कागदपत्र, त्यांचे नंबर, अरुणाचल प्रदेश आरटीओ कार्यालयातील कागदपत्रे हे सर्व एकत्र करून, विरार आरटीओमार्फत १३ डिसेंबर २०२३ ला विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विरार आणि सोलापूरमध्ये तीन वाहने मिळाली असून अन्य वाहनांचा आणखी शोध लागलेला नाही.

बनावट वाहनांची नोंदणी झाली, त्यांची सर्व कागदपत्रे अधिकृत असल्याचे दाखवण्यात आले होते. पण संशय आला, तेव्हा त्या वाहनांच्या चेसिस क्रमांक आम्ही संबंधित वाहनाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला पाठविले, तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही नोंद नसल्याचे समोर आले. त्या कंपन्यांकडून अहवाल प्राप्त होताच पोलिसांत तक्रार दाखल केली. नोंदणी कागदपत्रांनुसार वाहनाच्या मालकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. पण उत्तर आले नाही.
- दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, विरार

वाहनांच्या बनावट कागदपत्रांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या कागदपत्रांवरून अधिक तपास करत आहोत.
- राजेंद्र कांबळे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विरार पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com