शहर स्वच्छतेच्या कामाला वेग

शहर स्वच्छतेच्या कामाला वेग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहीम सुरू आहे. महापालिकेकडून या अभियानाला व्यापक स्वरूप दिले जात आहे. आता या स्वच्छता अभियानाला केंद्राकडून आर्थिक बूस्टर मिळणार आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत पालिकेला ६२० कोटी अनुदान मिळाले आहे. त्यामुळे या अभियानाला आणि मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारण्याला वेग येणार आहे. केंद्र सरकारच्या निधीतून साफसफाईसाठी लागणाऱ्या मशिन आणि यंत्रसामग्री खरेदी केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबईत मोठ्या प्रमाणात विकासकामे आणि विविध सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यामुळे हवेत धुलिकणांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात प्रदूषणही वाढत आहे. अशात ऐन दिवाळीत हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने दोनशेची पातळी ओलांडली होती. त्यामुळे येथील हवेची गुणवत्ता धोकादायक स्थितीत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. तसेच उच्च न्यायालयाने महापालिकेला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने हवेचा गुणवत्ता स्तर सुधारण्याबाबत उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक समाधानपातळीवर आहे.
महापालिकेने शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या स्वच्छता अभियानाला वेग यावा आणि प्रदूषण रोखण्यास मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार केंद्राच्या वित्त आयोगाने ६२० कोटी रुपयाचे पालिकेला अनुदान दिल्याची माहिती पालिकेने दिली.
….
प्रदूषण रोखण्यास मदत
वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आजार बळावत आहेत. हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. नागरिकांना दमा, श्वसनाच्या विकार वाढत आहेत. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत असून मुंबईतील हवेचा स्तर उंचावण्यासाठी मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला त्याची अंमलबजावणी पालिका प्रशासनाकडून केली जात आहे. प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूककोंडी कमी करणे, वांद्रे-कुर्ला संकुल, लोअर परळसह मुंबईतील विविध भागांत वाहनांद्वारे उत्सर्जित होणारी हवा व ध्वनी प्रदूषण रोखणे अशा उपाययोजना करण्यासाठी केंद्राने आता निधी उपलब्ध केल्यामुळे प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहेत
…..
या साहित्याची खरेदी
केंद्र सरकारने पालिकेने दिलेल्या निधीतून यांत्रिकी झाडू खरेदी, वाहतुकीसाठी ई-बस खरेदी करणे, बॅटरी चार्जिंग स्टेशन सुरू करणे, हरित पट्ट्याची वाढ व सुधारणा करणे, कचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करणे ही कामे केली जाणार असल्याची पालिकेने सांगितले.
-------------
विविध उपाययोजना सुरू
पालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहे. ज्या बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषणाचे नियम पाळले जात नाहीत अशा बांधकामांना नोटिसा पाठविणे आणि बांधकामे थांबविणे, दंड आकारणे अशी कारवाई पालिकेने सुरू केली आहे. बांधकामाच्या ठिकाणी ३५ फूट उंच भिंत बांधणे सीसीटीव्ही बसवणे, धुळीचे कण पसरू नये यासाठी पडदे लावणे, पाण्याची फवारणी करणे, स्प्रिंकलर बसवणे अशा २७ प्रकारची नियमावली पालिकेने जारी केली आहे. पालिकेच्या महास्वच्छता अभियानांतर्गत ही कारवाई सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com