पहिल्या ‘सी फूड प्लाझा’ला वाढती पसंती

पहिल्या ‘सी फूड प्लाझा’ला वाढती पसंती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : माहीम कोळीवाडा येथे चौपाटीलगत मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या पहिल्या ‘सी फूड प्लाझा’ला मुंबईकरांची पसंती मिळत आहे. आतापर्यंत ३० हजार पर्यटकांनी सी फुडचा आस्वाद घेतला आहे. या उपक्रमामुळे माहीम कोळीवाड्यातील स्थानिकांना आता रोजगाराची संधी मिळाली आहे.
मुंबईतील कोळीवाड्यातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने शालेय शिक्षण मंत्री आणि शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महिला बचतगटांद्वारे संचलित ‘सी फूड प्लाझा’ संकल्पना राबविण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार माहीममध्ये पहिला ‘सी फूड प्लाझा’ सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी दर्जेदार अन्नपदार्थ पुरवतानाच व्यवसायासाठी पूरक अशी साधनसामुग्री पुरविण्याचे निर्देशही पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होते. सी फूड प्लाझाला प्रत्येक आठवड्याला सुमारे ५०० जण भेट देत आहेत. गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी शुभारंभ झाल्यापासून आतापर्यंत ३० हजार पर्यटकांनी या सी फूड प्लाझाच्या ठिकाणी भेट दिली आहे.
माहीम चौपाटीवर ‘सी फूड प्लाझा’साठी दालन पालिकेमार्फत उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच पाच टेबल, २० खुर्च्या, विद्युत रोषणाई, ओला आणि सुका कचरा संकलन डबे, ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी एप्रोन, हातमोजे, हेडर कॅप आदी बाबी पुरविण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक महिला बचतगटाला दालनावर त्यांचे माहिती फलक लावलेले आहेत. नोंदणीकृत कोळी महिला बचतगटांना ‘सी फूड प्लाझा’ मध्ये दालन उभारणी आणि संचलनाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना सेवा पुरवताना स्वच्छतेबाबत आणि पदार्थांच्या गुणवत्तेबाबच्या पालिकेच्या आदेशाची पालन केले जात आहे.
---------------
स्थानिक महिलांना रोजगार आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी कोळी महिलांच्या बचतगटांना नियोजन विभागाने साधनसामुग्री पुरवली आहे. तसेच आर्थिक पाठबळही उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमामुळे राहत्या ठिकाणीच रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे.
- डॉ. प्राची जांभेकर, संचालक (नियोजन), मुंबई महापालिका
----------------
मत्स उत्पादन प्रशिक्षण
महिला बचत गटांना मत्स्य उत्पादनावर आधारित प्रशिक्षणही देण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण आणि विक्रीयोग्य मत्स्य आधारित उत्पादने तयार करण्यासाठी मत्स्यपालन क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य उपलब्ध करून देणे पालिकेचा उद्देश होता.
....
बोटीची सफर
सी फूड प्लाझा येथे आस्वाद घेण्यासाठी आणि पर्यटनासाठी येणाऱ्यांना आता माहीम ते वरळी बोट सफरचा अनुभवही घेता येत आहे. त्यामुळे या उपक्रमाला मुंबईकरांसह पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे.
....
माहीम किल्ल्याला नवी झळाळी
आठशे वर्षे जुन्या माहीम किल्ल्यावर सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच येत्या काही वर्षांत किल्ल्याला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. या माध्यमातून शहरातील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com