Bhiwandi Loksabha: भिवंडी लोकसभेत मंत्री कपिल पाटील मारणार हॅट्रिक की बसणार धक्का?
हेमलता वाडकर
लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तसेच महायुतीचे जागावाटपही झाले नसून उमेदवारही निश्चित झालेले नाहीत. असे असले तरी ‘अब की बार, हॅट्रिक पार’ असा विश्वास असल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे.
त्यांच्या विजयासाठी संपूर्ण स्थानिक भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. गाव चलो अभियानांतर्गत घरोघरी गाठीभेटी वाढवण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरी या वेळी खासदार कपिल पाटील यांना ही निवडणूक थोडी जड जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी महाविकास आघाडीसह काही मातब्बर स्थानिक नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यांनीही वातारण निर्मिती सुरू केली आहे.(kaptil patil loksabha)
भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर गावचा सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री अशी खासदार कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा बँक अध्यक्ष म्हणूनही आपली छाप पाडली; पण २०१४ मध्ये त्यांनी मोदी लाटेत राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपच्या तिकिटावर भिवंडी लोकसभा काबिज केली.
अर्थात त्या वेळी शिवसेनेचीही त्यांना भक्कम साथ मिळाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा २०१९ मध्येही ते निवडून आले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. पंचायतराज मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. तिसऱ्यांदाही पक्ष आपल्यालाच उमेदवारी देणार, असा त्यांचा दावा आहे; पण या १४ वर्षांच्या कालखंडात पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. इतर पक्षीयांसोबतच त्यांच्या स्वपक्षातही त्यांच्याविरोधात अनेक आव्हाने उभी करण्याच प्रयत्न सुरू झाले आहेत.(who will win bhivandi loksabha)
भाजप आमदार किसन कथोरे हेसुद्धा भिवंडी लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा मध्यंतरी होती. तशी वातावरण निर्मितीही करण्यात आली; पण सर्वच अलबेल असल्याचे हे दोन्ही नेते सांगत असले, तरी त्यांच्यातील कुरबूर अनेकदा समोर आली आहे.
या वादात जिजाऊ संघटनेचे नीलेश सांबरे यांनी उडी मारली आहे. तेसुद्धा भिवंडी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्याची तयारी सुरू केली आहे; मात्र ही जागा जर भाजपने किसन कथोरे यांना दिली, तरच आपण निवडणुकीतून माघार घेणार, असे त्यांनी जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एमआयएमही रिंगणातशिवसेना, राष्ट्रवादीनंतर शिंदे गट आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गट असा प्रवास केलेले सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा हेसुद्धा महाविकास आघाडीतर्फे या लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याची तयारी करत आहेत. काँग्रेसने या मतदारसंघाचा दावा सोडला आहे; पण ऐनवेळी मराठी मतांसाठी मनसे किंवा मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमचा उमेदवारही रिंगणात उतरू शकतो.
अटीतटीची लढत
भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात भिवंडी पश्चिममध्ये महेश चौघुले आणि मुरबाडमध्ये किसन कथोरे हे भाजपचे दोन आमदार आहेत. शहापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दौलत दरोडा, भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पक्षाचे रईस शेख, तर उर्वरित भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे व कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भाईर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. महायुतीतील चार आमदारसोबत असल्याने खासदार कपिल पाटील यांचे पारडे सध्यातरी जड आहे.
मतांचे ध्रुवीकरण होणार
भिवंडी शहर व परिसर मुस्लिमबहुल असले, तरी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भूमिपुत्र आहेत. याशिवाय कल्याण, मुरबाड, शहापूर या मतदारसंघामध्ये हिंदू मतदार आहेत. कपिल पाटील, नीलेश सांबरे आणि बाळ्या मामा अशी लढत झाली, तर कुणबी आणि आगरी मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.(agri - koli voters in maharashtra)
दुसरीकडे एमआयएममुळे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण नाकारता येत नाही. शिवसेना ठाकरे गटाला मानणाराही मोठा वर्ग भिवंडी लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस, समाजवादी पक्षाची मते जर बाळ्या मामा यांच्या ओंजळीत पडली, तर कपिल पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.(kapil patil bhivandi loksabha)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.