

जव्हार, ता. ३ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन थंडीचा गारठा कमी होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक स्वरूपात जाणवायला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या जव्हार, विक्रमगड, तलासरी, वाडा परिसरात उन्हाची दाहकता चांगलीच जाणवते, यावर उपाय म्हणून नागरिक, वाहनचालक स्वतःचे संरक्षण करण्यासाठी टोपी, शॉल; तर महिला वर्ग स्कार्फ वापरतात; परंतु सध्या काळ्या रंगाचे गॉगल वापरण्याचे फॅड चांगलेच वाढले आहे. रस्त्याशेजारी गॉगल विक्रीची दुकाने थाटलेली दिसून येत आहेत.
हल्ली तरुणाईला कम्फर्टेबल जीवन जगायला आवडते. त्यातच तरुणाईचे स्टाईलमध्ये राहण्याचे आवडते माध्यम म्हणजे ‘गॉगल’ होय. फॅशनच्या जगात लूकसोबतच फायदेशीर ठरणाऱ्या फॅशनेबल वस्तू वापरण्यावर हल्ली संपूर्ण फॅशन जगताचा भर आहे. उन्हाळ्यात कार्यालयात, महाविद्यालयात जाणारी तरुणाई गाडी चालवताना उन्हामुळे डोळ्यांना त्रास होत असल्याने सनग्लासेस वापरते. सनग्लासेस लावल्यानंतर क्षणात तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळण्यास मदत होते. कोणत्याही आऊटफिटसोबत सनग्लासेस तुम्हाला मॉडर्न लूक देतात. उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी शोध लागलेल्या गॉगल्सचे रूपांतर आता फॅशन ॲक्सेसरीजमध्ये झाले आहे.
सनग्लासेस, ग्लेअर्स किंवा गॉगल्स हे आता सर्रास वापरले जातात. प्रत्येक जण त्याच्या आवडीप्रमाणे गॉगल घेतो. मात्र रस्त्याच्या कडेला मिळणारे गॉगल्स चांगल्या गुणवत्तेचे असतात का, असाही विचार करण्याची गरज आहे. हे स्वस्तातील गॉगल आपल्या डोळ्यांना किती महाग पडू शकतात. सध्या मुख्य रस्त्यावर गॉगलची अनेक दुकाने सहज नजरेस पडतात, त्यात चांगल्या प्रतीचे गॉगलदेखील उपलब्ध होत आहेत.
गॉगलचे फायदे
सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होते. गॉगल घातल्याने हवेतील धूळ, परागकणापासून डोळ्यांचे संरक्षण होते. डोळ्यांची जळजळ आणि कोरडेपणा टाळण्यासाठी गॉगल वापरणे फायद्याचे ठरते.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून गॉगल्स, टोपी, स्कार्फचा वापर केला जातो; परंतु आजची तरुणाई ही एक फॅशन म्हणून गॉगलकडे पाहते. फक्त फॅशन म्हणून नव्हे तर डोळ्यांचे संरक्षण म्हणून या साधनाकडे पाहिले जावे.
- शौर्या लाडे, महाविद्यालयीन विद्यार्थिनी
नोकरीच्या निमित्ताने दुपारच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करावा लागतो. अशावेळी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी गॉगलचा वापर करावा लागतो. त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होण्यास मदत होते.
- प्रणील शिंदे, वाहनचालक
डोळे हा शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. वातावरणातील बदलानुसार डोळ्यांची निगा राखणे आवश्यक आहे. सध्या उन्हाचे प्रमाण अधिक जाणवत आहे, त्यामुळे संरक्षण म्हणून ठराविक वेळाने थंड पाणी डोळ्यांवर शिंपडणे गरजेचे आहे. चांगल्या प्रतीचे गॉगल वापरणेही डोळ्यांसाठी लाभदायक ठरू शकते.
- डॉ. महेश पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.