टपाल कर्मचाऱ्यांकडून एक लाख घरांचे सर्वेक्षण

टपाल कर्मचाऱ्यांकडून एक लाख घरांचे सर्वेक्षण

विरार, ता. १० (बातमीदार) : पंतप्रधान सूर्य घर (सौरऊर्जा पॅनेल) योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील जवळपास एक लाख घरांना मोफत वीज देण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी टपाल खात्याच्या पालघर विभागातील सहाशे कर्मचारी कामाला लागले आहेत. गेल्या चार दिवसांत चार हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती पालघर विभागाचे डाक अधीक्षक विनोद तळेकर यांनी दिली.

पंतप्रधान सूर्य घर योजनेंतर्गत देशभरातील नागरिकांच्या घरावर सौरऊर्जा पॅनेल उभे करण्यासाठी केंद्र सरकार प्रति कुटुंबाला आर्थिक साह्य देणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत घरगुती वीजनिर्मितीलाही चालना मिळणार आहे. सूर्य घर योजनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ नोव्हेंबरला घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत घरावर सौरऊर्जा पॅनेल उभारण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी ४० हजार रुपये व जास्तीत जास्त ७८ हजारांचे आर्थिक साह्य देणार आहे. या योजनेतून घरात वीजपुरवठा होणार असून घरगुती वीजनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत निवासी छतावरील सौर पॅनेलसाठी केंद्राकडून एक किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी खर्चाच्या ६० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. दोन ते तीन किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त अनुदानाची रक्कम ७८ हजार रुपये असणार आहे. पालघर डाक विभागातील तालुक्यांतील प्रत्येक कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पालघर डाक विभागातील ६०४ कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत.

प्रत्येकी १५० घरांचे सर्वेक्षण
पालघर डाक विभागातील मुख्य डाकघर, उप डाकघर, शाखा डाकघरमधील ६०४ कर्मचारी प्रत्येकी १५० घरे याप्रमाणे एक लाख घरांचे सर्व्हेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणातून लाभार्थ्यांची निवड होणर आहे. विशेष म्हणजे, या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला महिन्याला ३०० युनिट वीज मोफत मिळणार आहे.

देशाला सौरऊर्जेत आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी डाक विभागाला देण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे.
- विनोद तळेकर, डाक अधीक्षक, पालघर विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com