सुंदरतेची ‘शिव’ ओलांडलेली शिवकर शाळा

सुंदरतेची ‘शिव’ ओलांडलेली शिवकर शाळा

वसंत जाधव : सकाळ वृतसेवा
पनवेल, ता. १० : पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी शिक्षण संस्था आहेत. त्या ठिकाणी मूलभूत आणि पायाभूत सुविधांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येथे आपल्या पाल्यांना प्रवेश देण्याच्या दृष्टिकोनातून पालकांची स्पर्धा लागलेली असते. मात्र, आता जिल्हा परिषदेच्या शाळासुद्धा मागे राहिल्या नाहीत. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानामध्ये पनवेल तालुक्यातील शिवकर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेने दुसरा क्रमांक पटकावत शैक्षणिक दर्जात शिक्षणाची ‘शिव’ ओलांडली आहे.
विद्यार्थीदशेत शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता आयुष्याचा भाग बनून जाते. शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करून शिक्षण आनंददायी, प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते. राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थीदशेतच स्वच्छतेचे संस्कार होण्यास मदत झाली. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात आले. हे अभियान पनवेल तालुक्यातही अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आले. त्यामध्ये खासगी शाळांबरोबरच रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांनीसुद्धा सहभाग नोंदवला.
या अभियानामध्ये शिवकर जिल्हा परिषद शाळेनेसुद्धा सहभाग घेतला. हे गाव अत्यंत उपक्रमशील असून शिक्षण आणि आरोग्याला महत्त्व देणारे आहे. राज्याला दिशादर्शक असे उपक्रम शिवकर गावामध्ये राबवले गेले. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ ही एक चळवळ म्हणून ग्रामस्थांनी हाती घेतली. अर्थात मुख्याध्यापक संगीता भोईर, केंद्रप्रमुख एन. के. गीते यांनी गटशिक्षणाधिकारी सीताराम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेचा कायापालट केला. या ठिकाणी सुसज्ज इमारतीबरोबरच शैक्षणिक साहित्य, अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासेस, प्रोजेक्टर, एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत लोकसहभाग वाढवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून विशेष योजना आखण्यात आली. स्काऊट गाईड उपक्रम, कौशल्य केंद्रात प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना रोजगार मार्गदर्शन करण्यात आले. आर्थिक साक्षरता मार्गदर्शन अभियान या शाळेमध्ये राबवण्यात आले. वाचाल तर वाचाल या ब्रीदवाक्याचा अवलंब करून महावाचन चळवळ सक्रिय करण्यात आली. शासनाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये शाळेने सहभाग नोंदवला. पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

-------------
सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनची सोय
प्लास्टिक व तंबाखूमुक्त शाळा करण्यातही शिवकर गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. याशिवाय शैक्षणिक सहल स्नेहसंमेलन आणि विविध स्पर्धांचे आयोजन वर्षभर करण्यात आले. पोषण आहार सप्ताह व तृणधान्य सप्ताह शाळेमध्ये संपन्न झाला. नव साक्षरता अभियान या ठिकाणी राबवण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने क्रीडा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला. किशोरवयीन मुलींसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. सॅनिटरी पॅड व वेंडिंग मशीन त्याचबरोबर डिस्पोज यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली.

------------
सीएसआरमधून शाळेचा कायापालट
सामाजिक बांधिलकी या उपक्रमातून वेगवेगळ्या कंपनी आणि एनजीओकडून शिवकर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेसाठी सीएसआर फंड उपलब्ध झाला. एसएमसीच्या माध्यमातून १२ लाख रुपयापर्यंत वस्तूरूपाने मदत करण्यात आली. एसजी कंपनीतर्फे पिण्याच्या पाण्याचा प्लांट बसवण्यात आला. विविध एनजीओच्या सहकार्यातून सर्व वर्गांना इंग्रजी व गणित विषयांचे प्रभावी अध्यापन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले. शाळेमध्ये सोलर ऊर्जा व मनोरंजनाची सोय करण्यात आली.

------------
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत आम्ही सूक्ष्म नियोजन, त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. शाळेतील प्रत्येक शिक्षकाने निकषनिहाय राबवलेले दर्जेदार उपक्रम, स्वच्छता मॉनिटर, महावाचन चळवळ, नवभारत साक्षरता अभियान यासोबतच परसबाग व्यवस्थापन, शालेय रंगरंगोटी या सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष देऊन अभियानात सहभाग घेतला आणि त्यातूनच यश मिळाले.
- निंबाजी गीते, केंद्रप्रमुख कालुंद्रे, पोयंजे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com