महिलांमध्ये समाजात क्रांती घडवून आणण्याची ताकद

महिलांमध्ये समाजात क्रांती घडवून आणण्याची ताकद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महिला समाजाला आधार देण्याचे कार्य करत असतात. समाजात क्रांती घडवून आणण्याची ताकद त्यांच्यात आहे. शिवसेना महिला आघाडी अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ‘शिवदुर्गा महिला संमेलन’ मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शनिवारी पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी तसेच महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये, महिला बचत गट, लेक लाडकी, लखपती योजना, बस प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, महिला बचत गटांना सक्षम भांडवल उभे करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले आहेत. ‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ या अभियानांतर्गत जवळपास तीन कोटींपेक्षा अधिक महिलांना फायदा झाला. नुकतेच राज्य सरकारने महिला धोरण जाहीर केले आहे. यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक भरीव कार्य होणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ‘दिल्ली-मुंबईत आमचं तोरण हेच आमचे महिला धोरण’ यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदावर आणण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने काम करायचे आहे, असे आवाहन शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केले.


राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन
राज्यभरात ‘शिवदुर्गा महिला संमेलन’सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये कौशल्य, समाजमाध्यमांचा उपयोग करणे, महिलांचे आरोग्य, महिलांविषयक झालेले नवीन कायदे, नुकतेच जाहीर झालेले महिला धोरण आणि अतिशय महत्त्वाचे असते ते म्हणजे स्त्रियांनी नेटवर्क किंवा सातत्याने कशा पद्धतीने सामूहिक काम करावे, याच्या कार्यपद्धती अशा अनेक विषयांवर आगामी काळात काम केले जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
......
अनेक योजना सरकार राबवत आहे. मात्र, त्या योजना कशाप्रकारे राबवायच्या यासंदर्भात ‘शिवदुर्गा महिला मेळाव्या’तून महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
- डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com