कल्याणमध्ये भाजप-शिंदे गटांत धुसफूस

कल्याणमध्ये भाजप-शिंदे गटांत धुसफूस

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० ः कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून दुसरीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावतीने स्मारकासाठी केलेल्या पाठपुराव्याच्या कागदपत्रांवर फक्त भाजप नेत्यांचेच फोटो असल्यामुळे कल्याण लोकसभा मतदारासंघात शिंदे गटासोबत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेली धुसफुस पुन्हा समोर आली आहे.
कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या ५/ ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासन व शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, या बॅनरबाजीत सध्या भाजपचे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्यावतीने लावले आहेत. या फलकांवरील स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्यासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या पाठपुराव्याचे दाखले दिले गेले आहेत. तसेच भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांच्या फोटोबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचेच फोटो आहेत; तर मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना नेत्यांचे फोटो लावले नसल्याने दोन्ही पक्षांमधील बॅनरची चर्चा आहे.
---------------------------------
निवडणुकीच्या तोंडावरच वाद
आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या भाजप आमदार गायकवाड हे गोळीबार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघात त्यांच्या पत्नी उतरल्या असून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेला आव्हान दिले जात असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com