‘नायर’मध्ये दीड वर्षांनी रेडिओथेरपी सुरू

‘नायर’मध्ये दीड वर्षांनी रेडिओथेरपी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पालिकेच्या नायर रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली रेडिओथेरपी सुविधा अखेर सुरू झाली आहे. यामुळे स्तन आणि तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. तसेच टाटा रुग्णालयावर पडणारा भार कमी होण्यास मदत होणार आहे.
नायर रुग्णालयात गेल्या दीड वर्षापासून नायर रुग्णालयातील रेडिओथेरपी विभाग बंद पडत होता. त्यामुळे या रुग्णालयात येणाऱ्या कर्करुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात किंवा टाटा रुग्णालयात रेडिओथेरपीसाठी जावे लागत होते. टाटा रुग्णालयावरही त्याचा अतिरिक्त भार पडत होता. अशात आता नायर रुग्णालयातील हा विभाग पुन्हा सुरू झाला आहे. स्तन आणि तोंडाचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांसाठी कोबाल्ट रेडिओथेरपी मशीन नायर रुग्णालय प्रशासन आणि ऑटोमिक एनर्जी विभागाच्या सहकार्याने आणली गेली आहे.
स्तन आणि तोंडाच्या कर्करोगासाठी केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि शस्त्रक्रिया या तीन पद्धतीचा वापर केला जातो. शस्त्रक्रिया झाल्यावर अनेक रुग्णांना रेडिओथेरपीची गरज भासते. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने दाखल झालेल्या मशीनमुळे आता जवळपास दिवसाला ६० ते ७० रुग्णांची रेडिओथेरपी केली जाईल. तसेच गरुजू रुग्णांना सोयीस्कर उपचार मिळावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
नवीन कोबाल्ट ६० सोर्स मशिनचे इन्स्टॉलेशन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सोर्स कॅलिब्रेशन आणि डोसमेट्री केली जाणार आहे. त्याचा अहवाल अणुऊर्जा नियामक मंडळाकडे पाठवला जाईल. अणुऊर्जा नियामक मंडळाच्या परवानगीनंतर १० ते १५ दिवसांनी कोबाल्ट -६० टेलीथेरपी युनिट ऑपरेट करण्यासाठी रुग्णावर उपचार सुरू केले जातील, असे मेढेकर यांनी सांगितले.
.....................................
रुग्णांना दिलासा
नायर रुग्णालयात यापूर्वी दिवसाला ३० ते ४० रुग्णांवर उपचार केले जायचे. आता ही क्षमता वाढली असून कोबाल्ट ६० टेलिथेरपी युनिटमुळे दररोज ६० ते ७० रुग्णांवर उपचार केले जातील. या कोबाल्ट ६० मशीनची किंमत १.१० कोटी रुपये एवढी आहे. यासाठी अणुऊर्जा विभागाकडून ७७ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. तर एनएम बुधराणी संस्थेने १.३५ लाख आणि पालिका निधीतून २९.५० लाखांची तरतूद केली गेली.
.....................................
कार्यक्षमता वाढणार
नव्या कोबाल्ट मशीनमुळे कामाचा दर्जा आणि कार्यक्षमता वाढल्याने रुग्णसेवेत कोणताही अडथळा होणार नाही. रेडिओथेरपी या उपचारपद्धतीत कर्करोगाच्या पेशींना मारण्यासाठी आणि ट्यूमरचा आकार कमी केला जातो. त्यामुळे मुंबईसह आसपासच्या शहरातून पालिका रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना ही सुविधा पुन्हा सुरू झाल्याने दिलासा मिळणार आहे.
.................................
विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचे दान
नायर रुग्णालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास एक लाख रुपये किमतीची पुस्तके लायब्ररीला दान करण्यात आले आहेत. टीजीए या संस्थेने ही ९५ पुस्तके दान केली. डॉ. रत्ना मगोत्रा यांनी पुस्तकांसह कान- नाक- घसा विभागाला तीन कॉक्लिअर इम्प्लांट दान केली आहेत. १९.५० लाख एवढी किंमत असलेल्या कॉक्लिअर इम्‍प्लांटमुळे जन्मापासून ऐकू न येणाऱ्या लहान मुलांना ऐकू येण्यास मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com