पक्ष्यांना उष्माघाताचा धोका

पक्ष्यांना उष्माघाताचा धोका

ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) : अवकाळी पाऊस, हवामान बदल, भरदुपारी पडणारे कडक ऊन अशा वातावरणाची झळ केवळ माणसांनाच नव्हे तर पशु, पक्ष्यांनाही पोहचू लागली आहे. अन्न, पाण्याची शोधाशोध करण्यासाठी पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. कोपरी येथे बुधवारी (ता. ३) आकाशात उडत असलेली घार अचानक खाली कोसळली अन् तेथील एका कार्यालयात आली. कर्मचाऱ्यांनी तिला पाणी पाजल्यानंतर काही वेळाने ती उडून गेली. पक्ष्यांनादेखील उष्म्याचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी सोसायटीतील बाल्कनी, गच्ची, खिडकीत झाडांवर आदी ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन पक्षीप्रेमींनी केले आहे.

ठाण्यात उष्म्याचा पारा ४० अंशापर्यंत वाढला आहे. कडक उन्हाळा सुरू झाला आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. माणसांप्रमाणेच पक्ष्यांनादेखील उन्हाचा त्रास अधिक होत आहे. सकाळी अन्नाच्या शोधात बाहेर पडणाऱ्या पक्ष्यांना उष्मा सहन करावा लागत आहे. काही वेळा रस्त्याच्या कडेला अनेक पक्षी मुर्च्छित अवस्थेत पडलेले आढळून येत आहेत. त्यामुळे पक्ष्यांची तृष्णा भागवण्यासाठी घराची खडकी, बाल्कनी, टेरेस आदी ठिकाणी पाणवठे करणे आवश्यक आहे.

पाणवठे तयार करण्याचे आवाहन
पक्षी उष्म रक्तीत आहेत. अनेक प्रकारच्या पिसांनी त्यांचे शरीर आच्छादलेले आहे. त्यामुळे उष्म्यात शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढते. पक्षी पाणी कमी पितात. उन्हात त्यांना पाण्याची जास्त आवश्यकता असते. पोटातील पाण्याचा अंश कमी झाला की हवेत बरेच वेळा उडणारा पक्षी खाली कोसळतो. सकाळच्या वेळी अन्नाच्या शोधात पक्षी खूप दूर अंतरावर जातात. उष्म्याचा अंदाज न आल्याने उडता उडता पोटातील पाण्याची मात्रा कमी होण्याची शक्यता असते. अशा वेळी नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाणवठे करावेत. तसेच याच्या जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा वापर करावा, असे आवाहन ज्येष्ठ पशुवैद्यक डॉ. युवराज कागिनकर यांनी दिली.

शहरात सिमेट क्राँक्रीटच्या जंगलामुळे पक्ष्यांचा निवाराच हरवला आहे. दयाळ, सातभाईसारखे अनेक पक्षी मुंबई-ठाणे शहरात दिसणे दुर्लभ झाले आहे; मात्र पाणवठ्यामुळे असे पक्षी कदाचित नजरेला पुन्हा दिसू शकतील.
- प्रशांत सिनकर, पर्यावरण अभ्यासक

पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी शक्यतो माती अथवा इकोफ्रेंडली भांडी वापरा. लिंबाचे चारपाच थेंब आणि काळ्या मिठाचे दोन खडे टाकावे, जेणे करून पक्षांना उडण्याचे बळ मिळेल.
- डॉ. युवराज कागिनकर, ज्येष्ठ पशुवैद्यक

बुधवारी आम्ही कार्यालयात काम करत असताना अचानक घार खाली पडली. थोड्या वेळाने पुन्हा उडण्याचा प्रयत्न करताना ती कार्यालयात येऊन पडली. तिला पाणी पाजले. त्यानंतर थोड्या वेळाने तिला तरतरी आली अन् ती पुन्हा आकाशात उडाली. तिला तहान लागली होती.
- समीर मांढरे, कर्मचारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com