माणगाव पोलिस ठाण्याला मिळणार नवीन इमारत!

माणगाव पोलिस ठाण्याला मिळणार नवीन इमारत!

माणगाव पोलिस ठाण्याला मिळणार नवीन इमारत!
स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वतंत्र जागेत उभारणार प्रशस्त कर्मचारी निवास
माणगाव, ता. ४ (वार्ताहर) : स्वातंत्र्यपूर्व काळापासून उभे असलेल्या माणगाव पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासाची पडझड झाली होती. निवास मोडकळीस आल्याने कर्मचाऱ्यांना भाड्याच्या खोलीत आश्रय घ्यावा लागत होता. याप्रकरणी प्रसारमाध्यमातून टीका झाल्‍यावर माणगाव पोलिस ठाण्याला नवीन स्वंतत्र व सर्व सोयींयुक्त इमारत मिळणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्‍या निवासस्‍थानासाठी प्रशस्त जागेत तीन मजली इमारत उभी राहणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात माणगावमध्ये १९१८-१९ रोजी दगडी चिऱ्यामध्ये पोलिस चौकीचे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाला १०४ वर्षे पूर्ण झाले आहे. त्‍या काळी इंग्रजानी बांधलेली ही एक कचेरी होती. त्या कचेरीतच पोलिस चौकीचे काम चालत असे. तर या चौकीजवळच त्यावेळी ब्रिटीश सरकारने कर्मचारी संख्या लक्षात घेता निवासस्थान उभारले होते. त्‍यानंतर १९६७-६८ मध्ये पोलिस ठाण्यामध्ये अधिकाऱ्यांसाठी एक निवासस्थान तर २६ कर्मचाऱ्यांसाठी दोन चाळी बांधण्यात आल्‍या. १९८५-८६ मध्ये तिसरी चाळ बांधण्यात आली. यात १२ निवासस्थाने बांधण्यात आली होती. त्यात १२ पोलिस कर्मचारी राहत होते. या तिन्ही चाळीचे क्षेत्र ७०८१.४० चौरस मीटर असून ही जागा शासनाची आहे. सध्या या निवासस्‍थानाची पडझड झाली आहे. दरम्‍यानच्‍या काळात पोलिस वसाहतीची राज्य सरकारच्‍या माध्यमातून दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, हे बांधकाम खूप जुने असल्यामुळे त्या काळी बैठे जोते बांधून त्यावर बांधकाम करण्यात आले होते. कालांतराने आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांवर भराव झाल्‍यामुळे इमारत खचली होती. गेल्या तीन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने निवासावरील पत्रे उडाले होते. तर भिंती पडल्याने इमारतीचे प्रचंड नुकसान झाले होते. अशा इमारतीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना गुजारण करावी लागत होती. त्‍यामुळे याप्रकरणी प्रसारमाध्यमांतून टीका करण्यात येत होती. अखेर याची शासनाचे दखल घेतली असून सध्या नवीन पोलिस चौकीसह निवासी इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे.
....................
माणगाव पोलिस ठाणेअंतर्गत १४० गावांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ६८ अधिकारी व कर्मचारीवर्ग काम करतात. मोडकळीस आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवास इमारत पाडून त्‍या जागेवर नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. या जागेवर साधारण निवडणुकीनंतर पूर्व दिशेला स्वतंत्र जागेत सर्व सोयींयुक्त पोलिस ठाण्याची भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. तर दक्षिण व उत्तर दिशेला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तीन मजली इमारती बांधण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये ६० कर्मचारी व सहा अधिकाऱ्यांच्‍या निवासाची सोय करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com