गुढीपाडव्याला पुरणपोळी, श्रीखंडपुरीचा बेत

गुढीपाडव्याला पुरणपोळी, श्रीखंडपुरीचा बेत

ठाणे, ता. ४ (बातमीदार) : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते, त्यामुळे घराबाहेर रांगोळी काढली जाते, दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. तसेच घरोघरी गुढी उभारली जाते. काठीला नवी कोरी साडी, कडुलिंबाचा पाला, फुलांचा हार आणि साखरेची घाटी लावून गुढी उभारली जाते. घरी पांरपरिक कपडे घालून, मनोभावे गुढीची पूजा केली जाते. गुढीसाठी खास गोडाचा नैवेद्य करण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक घरी पुरणपोळी आणि श्रीखंड पुरीचा खास बेत ठरलेला असतो. होळी अन् गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी अन् श्रीखंडपुरीचा बेत हमखास असतोच. यादिवशी गोड, खमंग, लुसलुशीत पुरणपोळीला अधिक मागणी असते.

होळीनंतर गुढीपाडव्यासाठी घरगुती व विविध खाद्यपदार्थांच्या दुकानात, ग्राहकवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळी विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच केसर, ड्रायफ्रूट, पुष्पखंड, स्ट्रॉबेरी, आम्रखंड अशा विविध प्रकारचे श्रीखंडदेखील पुरणपोळीच्या शेजारी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना धावपळीच्या जीवनात पुरणपोळी करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे त्या रेडिमेड पुरणपोळीला अधिक पसंती देत आहेत.

सध्या पारंपरिक पद्धतीबरोबरच विविध प्रकारे पुरणपोळी बनवली जाते. डाळ, खोबरे, मूगडाळ, तीळ, गाजर, खजूर, खव्याची पुरणपोळी, शुगर फ्री, अननस, गुलकंद, चॉकलेट, बदाम, फणस, ड्रायफ्रूट असे विविध पुरणपोळींचे प्रकार उपलब्ध आहेत.

खाद्यसंस्कृतीत महत्त्वाचे स्थान
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत पुरणपोळीला महत्त्वाचे स्थान आहे. अनेक सणांत पुरणपोळी ही केलीच जाते. गुढीपाडवा म्हटले की, पुरणपोळी, श्रीखंड इतर गोडधोड पदार्थाशिवाय गुढीपाडवा हा सण पूर्णच होत नाही. यावेळी इतर मिठाईच्या इतर प्रकारापेक्षा पुरणपोळी, श्रीखंडपुरीला ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. पुरणपोळी बनवण्याचे कामही तसे अवघड आणि वेळखाऊ आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना तर यासाठी निवांतपणा आणि पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने सण साजरे करणे कठीण होऊन बसते. त्यामुळे अनेकजणांचा विकत पुरणपोळी घेण्याकडे कल असतो.

दिवसाला १०० ते ५०० पुरणपोळ्या तयार केल्या जातात. तर सणासुदीच्या दिवशी १,५०० ते २,००० पुरणपोळ्या विक्री होतात. एक पुरणपोळी ही १० ते १५ दिवस व्यवस्थित टिकून राहते. त्यामुळे आतापर्यंत दुबई, अमेरिका, इंग्लंडला पुरणपोळ्या पोहोचल्या आहेत. तसेच गुढीपाडवाच्या ऑर्डर आतापासूनच यायला सुरुवात झाली आहे.
- विठ्ठल शेट्टी, पुरणपोळी विक्रेते


प्रकार किंमत (प्रतिनग)
डाळ - ३०
खोबऱ्याची - ३०
मूगडाळ - ३५
तीळ - ३५
गाजर - ४०
खजूर - ४०
खव्याची पुरणपोळी - ४०
शुगर फ्री - ४५
अननस - ४६
गुलकंद - ५०
चॉकलेट - ५५
बदाम - ६०
फणस - ६०
ड्रायफ्रूट - ७०
अंजीर - ७०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com