वेळेत मालमत्ता कर भरल्यास मिळणार ‘सूट’
वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न, करदात्यांना मिळणार १० टक्के सवलत

वेळेत मालमत्ता कर भरल्यास मिळणार ‘सूट’ वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न, करदात्यांना मिळणार १० टक्के सवलत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : ठाणे महापालिकेचा मालमत्ता विभाग मागील वर्षीपासून हायटेक झाला आहे. मालमत्ताधारकांना वेळेत बिले उपलब्ध करून देण्याबरोबरच बिल भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे मालमत्ता विभागाला करवसुलीत ९० टक्क्यांहून अधिक करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात यश आले होते. यंदा पालिकेने मालमत्ता कर वसुलीची मोहीम १ एप्रिलपासूनच सुरू केली आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत संपूर्ण कराची रक्कम जे करदाते एकत्रित भरतील अशांना मालमत्ता कराच्या सामान्य करामध्ये १० टक्के सूट देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

यंदा मालमत्ता कर विभागाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यंदा या विभागाला ८१९.७१ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आल्याने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मालमत्ता विभागाने १ एप्रिलपासूनच सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी महापालिकेच्या विभागामार्फत करदात्यांना देयके व कर भरण्याच्या लिंक एसएमएसद्वारे पाठविण्यात आल्या. मागील वर्षी हा उपक्रम यशस्वी झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे यंदादेखील हाच उपक्रम महापालिकेने हाती घेतला आहे.

करदात्यांना पहिल्या टप्प्यातच मालमत्ता कर भरण्यासाठी सवलत योजनाही जाहीर केली आहे. जे करदाते मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी १५ जूनपर्यंत महापालिकेकडे जमा करतील, अशांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

३१ ऑगस्टपर्यंतच वेळ
१५ जूनपर्यंत रक्कम भरल्यास १० टक्के सूट दिली जाणार आहे; तर १६ ते ३० जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास ४ टक्के, १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत भरल्यास ३ टक्के आणि १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत भरल्यास २ टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com