काँग्रेसकडे एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी

काँग्रेसकडे एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी

मुंबई, ता. ४ : अनेक वर्षे देशाची सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने ‘गरिबी हटाव’सारखी अनेक आश्‍वासने दिली; मात्र यातील एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे केवळ एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या गॅरंटीला देशातील जनता पुन्हा फसणार नाही. काँग्रेसने पाच गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायनामेड मालासारखी आहे, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केली.
भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप प्रदेश माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी या वेळी उपस्थित होते. उपाध्ये म्हणाले की, नक्कल करायलाही अक्कल लागते. ती अक्कलही काँग्रेसकडे नाही, हे मोदी सरकारची नक्कल करून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशाला दाखवून दिले आहे. मोदी मंदिरात गेले की यांचे नेते मंदिरांच्या पायऱ्या झिजवतात, मोदींनी गंगास्नान केले की यांचे नेते डुबकी मारतात, मोदी यांनी प्रचारयात्रा काढल्या की यांचे नेते देशात पदभ्रमणासाठी बाहेर पडतात.
दहा वर्षांत प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्यानंतरही ‘मोहब्बत की दुकान’सारखे फसवे मुखवटे घालून काँग्रेसी नेते जनतेकडे मतांची याचना करीत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली. ती पूर्ण करून दाखवली. ‘गरिबी हटाव’चा नारा देणाऱ्या काँग्रेसच्या काही मोजक्या नेत्यांची आणि पक्षाला वेठीस धरणाऱ्या गांधी घराण्याची गरिबी हटली; मात्र देश अधिकाधिक गरीब होत गेला. शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या नावाखाली बँकांच्या तिजोऱ्या भरून शेतकऱ्याच्या पदरात कर्जाचे ओझे कायमच ठेवण्याचा पराक्रम काँग्रेसी सत्ताधीशांनी केला, असा घणाघात उपाध्ये यांनी केला.
-----
गॅरंटी खरी करून दाखवली!
देशातील २५ कोटी लोकसंख्येच्या कपाळावरील दारिद्र्यरेषा मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे कायमची पुसली असून जगाने याची दखल घेतली आहे. कलम ३७० रद्द करणे, राम मंदिर उभारणी, औद्योगिक विकास, रोजगाराच्या संधी, महिलांचे सक्षमीकरण, अशा प्रत्येक क्षेत्रातील मोदी की गॅरंटी खरी करून दाखवली आहे, असे केशव उपाध्ये यांनी निदर्शनास आणून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com