प्रचाराबरोबरच उन्हाची दाहकता वाढली

प्रचाराबरोबरच उन्हाची दाहकता वाढली

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच शहरातही कमालीची उष्णता वाढली आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम पशु-पक्ष्यांसह मानवी जीवनावर होत आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निवडणुकांचा प्रचार करताना, तसेच कामानिमित्त उन्हात फिरताना वाढत्या उष्णतेपासून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच पालिका प्रशासनाकडूनही उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करायला हवे, काय करू नये, याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पार ३५ अंशापासून ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होते. १२ वाजता कडक ऊन पडते. दुपारी चारनंतर उन्हाच्या झळा कमी होतात. दरवर्षी शहरातील तापमान वाढताच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याविषयी पालिका प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येते. यंदा एप्रिलमध्ये शहरातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून मेमध्ये त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. याच काळात लोकसभा निवडणुकीचा प्रचार होणार आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. तसेच वाढत्या उष्णतेचा विचार करता, प्रचार करताना उमेदवारांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. तर उमेदवारांनादेखील ऊन वाढण्याआधीच प्रचार आवरता घ्यावा लागणार आहे.

काय काळजी घ्यावी?
पुरेसे पाणी प्या. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या. पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला. आपली बाहेरील कामे सकाळी दह वाजण्याच्या आत किंवा संध्याकाळी चारनंतर करा. चहा, कॉफी, दारू, कार्बोनेटेड द्रव पदार्थ सेवन करू नका. भर दुपारी गॅस किवा चुलीसमोर स्वयंपाक करणे टाळा. स्नायूंना गोळे, थकवा, घाम, अस्वस्थता, गुंगी अशी लक्षणे आढळली तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. उष्माघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला पालिका आरोग्य विभागाने दिला.

उष्माघाताची लक्षणे
अतिउष्णतेच्या संपर्कामुळे ‘हिट स्ट्रेस’ निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे उष्माघाताशी संबंधित आजार होऊ शकतात. डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे आणि बेशुद्ध पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे, अशा उष्माघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांनी दिली.

पालिका आयुक्तांचे आवाहन
उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून चक्कर येऊन पडणे, स्नायूंना पेटके येणे, डोकेदुखी, श्‍वासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, झटके येणे याची माहिती द्यावी, नजीकचे आरोग्य केंद्र / रुग्णालयात त्याबाबत नोंद करणे, तसेच उष्णतेच्या लाटेबाबत काळजी घेताना काय करावे, काय करू नये व उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराबाबत आशासेविकांना प्रशिक्षण देऊन याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच नागरिकांनीदेखील काळजी घ्यावी, असे आवाहन राव यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com