‘त्या’ पालिका अभियंत्यांच्या मागे
चौकशीचा ससेमिरा कशासाठी?

‘त्या’ पालिका अभियंत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कशासाठी?

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : कोरोनाच्या संकट काळात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बॉडीबॅगची चढ्या दराने खरेदी केल्याच्या आरोपांवरून पालिका अभियंत्यांची ईडी व आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी अभियंत्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने याचिकेची दखल घेत सरकारला सविस्तर माहिती देण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.
कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता महामारीशी लढलेल्या पालिका अभियंत्यांच्या मागे आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला आहे. अभियंत्यांच्या म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन आणि म्युनिसिपल मजदूर युनियनने ॲड. हर्षवर्धन सूर्यवंशी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज (ता. ४) न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी सरकारतर्फे ॲड. प्राजक्ता शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी खंडपीठाकडे वेळ मागितला. सरकारच्या या वेळकाढू भूमिकेवर याचिकाकर्त्या अभियंत्यांतर्फे ॲड. सूर्यवंशी यांनी आक्षेप घेत ही मुभा देऊ नये, अशी मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने सरकारला आणखी वेळ देत सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.
----
याचिकेत काय आहे?
१८५७च्या महामारी कायद्याचे कलम ४ तसेच २००५च्या आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींकडे आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीने दुर्लक्ष केले आहे. त्या तरतुदी विचारात घेतल्यास आम्ही कोरोनाकाळात पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार जे काम केले, त्यासाठी कुठलीही चौकशी वा कुठल्याही प्रकारचे ऑडिट लागू होत नाही, असा दावा पालिका अभियंत्यांनी याचिकेत केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com