बदलत्या वातावरणामुळे बागातदार चिंताग्रस्त

बदलत्या वातावरणामुळे बागातदार चिंताग्रस्त

बोर्डी, ता. २५ (बातमीदार) : गेल्या आठवड्यापासून वातावरणातील उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यानंतर आता ढगाळ वातावरणामुळे बोर्डी परिसरातील चिकू फळबागा, आंबा पिकावर मोठा दुष्परिणाम होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच भाजीपाला क्षेत्रासाठी पाण्याचा तुटवडा भासू लागल्यामुळे पीक उत्पादनात मोठी घट होईल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

बोर्डी परिसरात चिकू, आंबा, लिची, जाम यांच्या बागा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत. त्याचप्रमाणे नैसर्गिकरीत्या रानमेव्याच्या झाडांचा विकास झाला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून झाडांच्या पानावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे. याचा परिणाम रानमेव्‍यां‍च्या झाडावरदेखील झाला आहे. किंबहुना हंगामी भाजीपाला पिकांवरदेखील हळूहळू काळ्या बुरशीने अतिक्रमण सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

शेतकऱ्याला निसर्गाची साथ मिळत नसल्याने त्याच्या पदरी अपयश येत आहे. हवामानात प्रचंड उष्णता वाढल्यानंतर आता ढगाळ वातावरण झाल्यामुळे हवामानात प्रचंड आर्द्रता वाढल्याची नोंद झाली आहे. याचा दुष्परिणाम फळझाडांमध्ये पुढील हंगामात दिसून येईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

शेतकऱ्यांना मोठा फटका
मागील वर्षी बिपरजॉय चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता. यामुळे फळांचे प्रचंड नुकसान झाले होते. किंबहुना या वादळाचे दुष्परिणाम आजही शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. फळांची वाढ समाधानकारक होत नसल्याने बाजारपेठेत भाव समाधानकारक मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. फळांचा हंगाम लांबणीवर गेल्याने उत्तर भारतातील बाजारपेठेत फळांची मागणी घटली आहे.

काही शेतकऱ्यांनी पिकामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने जाम फळाची लागवड केली आहे. सध्या या पिकाचे उत्पादन सुरू झाले आहे; परंतु अचानक उष्णता वाढल्यामुळे काळ्या बुरशी रोगाचा व फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्याला फार मोठे नुकसान सोसावे लागणार आहे.
- नंदन दिनकर राऊत, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com